ऑनलाइन लोकमत
कटक, दि. 18 - पुणेमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या वन-डे लढतीत तीन गडी राखून विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावलेला असला तरी उद्या १९ जानेवारी रोजी इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या लढतीत ‘दव’ हा घटक निर्णायक ठरणार आहे. दव हा घटक उद्याच्या सामन्याच चिंतेचे कारण ठरणार आहे. आज 3 वाजता भारतीय संघाचे कटक येथे आगमन झाले आहे. संघाचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.
स्थानिक क्युरेटरच्या मते दव सायंकाळी ५.३० नंतर पडण्यास सुरुवात होते. सामन्याच्या दिवशीही असेच घडले तर नाणेफेक कौल निर्णायक ठरू शकतो. क्युरेटर पंकज पटनायक म्हणाले, ‘गेल्या काही दिवसांमध्ये बरेच दव पडत आहे. रासायनिक स्प्रे, दोन सुपर सोपर आणि दोर याद्वारे दवाचा प्रभाव कमी करण्यासाठी आम्ही सर्वोत्तम प्रयत्न करू. मैदानावरील हिरवळ आठ मिलिमीटर वरून सहा मिलिमीटरपर्यंत कापण्यात आली आहे. त्यामुळे दवबिंदू मातीत मुरण्यास मदत होईल.
यापूर्वी या मैदानावर २०१४ मध्ये सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात भारताने सरशी साधली होती. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पुणे येथे पहिल्या वन-डेमध्ये इंग्लंडने दिलेल्या ३५१ धावांचे लक्ष्य ७ गड्यांच्या मोबदल्यात ११ चेंडू राखून पूर्ण केले. दुसऱ्या लढतही मोठ्या धावसंख्येची होईल, अशी आशा आहे.
क्युरेटर म्हणाले, ‘माझ्यासाठी धावांबाबत भाकीत करणे कठीण आहे, पण नेहमीप्रमाणे यावेळीही येथे मोठी धावसंख्या उभारली जाईल. खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल आहे.
Traditional welcome for #TeamIndia in Cuttack #INDvENGpic.twitter.com/X1JD3VAuKw