नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने आज जाहीर झालेल्या विश्व बॅडमिंटन मानांकनात तीन स्थानाची झेप घेत कारकिर्दीतील सर्वश्रेष्ठ दुसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे.हैदराबादची ही २१ वर्षीय खेळाडू सायना नेहवालनंतर विश्व मानांकनात पहिल्या पाच जणात स्थान मिळविणारी दुसरी भारतीय खेळाडू बनली आहे. तिचे ७५७५९ इतके गुण आहेत. तिने जपानच्या अकाने यामुगाचीला दुसऱ्या स्थानावरून पछाडले. सिंधूने नुकतेच स्पेनच्या कॅरोलिना मारिनला अंतिम सामन्यात पराभूत करीत इंडियन ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. त्याचवेळी कुचिंग येथे सुरू असलेल्या मलेशियन ओपन सुपर सीरिजच्या सुरुवातीच्या सत्रात ती पराभूत झाली.सायना देखील मलेशिया ओपन स्पर्धेच्या सुरुवातीच्या सत्रात पराभूत झाली होती. ती एका स्थानाच्या नुकसानीसह ६४२७९ गुणांसह नवव्या क्रमांकावर आहे. महिला एकेरीत चीनची ताई जु यिंग प्रथम स्थानी आहे. तिचे ८७९११ इतके गुण आहेत. पुरुष गटात एकही खेळाडू पहिल्या दहा जणांच्या यादीत स्थान मिळवू शकला नाही.
सिंधू कारकिर्दीच्या सर्वश्रेष्ठ दुसऱ्या स्थानी!
By admin | Published: April 07, 2017 3:51 AM