मुंबई : पहिल्या सराव सामन्यात झालेल्या पराभवानंतर भारत ‘अ’ संघ इंग्लंड इलेव्हनविरुद्ध दुसरा सराव सामना गुरुवारी खेळेल. पहिल्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीने नेतृत्व केल्यानंतर, या सामन्यात मुंबईकर अजिंक्य रहाणे भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळेल. त्याचबरोबर, या सामन्यात रहाणेसह सुरेश रैना आणि युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत यांच्या कामगिरीवर विशेष लक्ष असेल. ब्रेबॉर्न स्टेडियमवर होत असलेल्या हा सामना इंग्लंडविरुध्दच्या आगामी मर्यादित षटकांच्या मालिकेपूर्वीचा अखेरचा सराव सामना असेल. यंदाच्या रणजी मोसमात पंतने चमकदार कामगिरी करताना सर्वांचे लक्ष वेधले आहे. १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत उपविजेत्या ठरलेल्या भारतीय संघाचा तो सदस्य होता, शिवाय धोनीनंतर भारतीय संघाचा भावी यष्टीरक्षक म्हणूनही त्याच्याकडे पाहिले जात असल्याने पंतकडे विशेष लक्ष असेल. झारखंडच्या इशान किशनवरही नजरा असतील. इशानही यष्टीरक्षक-फलंदाज असून, या सामन्यात यष्टीरक्षणाची जबाबदारी त्याच्यावरच असेल.दुसरीकडे अजिंक्य रहाणेची कामगिरी सर्वात महत्त्वाची आहे. इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेदरम्यान झालेल्या दुखापतीनंतर तो पुनरागमन करीत असून, एकदिवसीय मालिकेआधी हा सराव सामना रहाणेसाठी महत्त्वाचा आहे. त्याच वेळी भारतीय टी-२० संघातील स्थान कायम राखलेल्या रैनासाठीही स्वत:ला सिद्ध करण्याची ही नामी संधी असेल. अनुभवी शेल्डॉन जॅक्सन, विजय शंकर, परवेझ रसूल आणि दीप हुड्डा या अष्टपैलू खेळाडूंवरही भारत ‘अ’ संघाच्या फलंदाजीची जबाबदारी असेल, तर अनुभवी वेगवान गोलंदाज विनयकुमार, अशोक दिंडा आणि प्रदीप सांगवान यांच्यावर गोलंदाजीची मदार असेल. शिवाय स्पिनर शाहबाज नदीमदेखील निर्णायक ठरू शकतो. त्याचबरोबर, इंग्लंडदेखील मुख्य अष्टपैलू बेन स्टोक्स, यष्टीरक्षक जॉनी बेयरस्टॉ आणि वेगवान गोलंदाज लियाम प्लंकेट यांना सरावाची संधी देईल. पहिल्या सराव सामन्यात या प्रमुख त्रयीला विश्रांती देण्यात आली होती. (क्रीडा प्रतिनिधी)प्रतिस्पर्धी संघ :भारत ‘अ’ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिषभ पंत, सुरेश रैना, दीपक हुड्डा, इशान किशन, शेल्डॉन जॅक्सन, विजय शंकर, शाहबाज नदीम, परवेझ रसूल, आर. विनयकुमार, प्रदीप सांगवान आणि अशोक दिंडाइंग्लंड इलेव्हन : इआॅन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेयरस्टॉ, जॅक बॉल, सॅम बिलिंग्स, जोस बटलर, लियाम डॉसन, अॅलेक्स हेल्स, लियाम प्लंकेट, आदिल रशिद, जेसन राय, बेन स्टोक्स, डेव्हीड विली आणि ख्रिस वोक्स.
मुंबईमध्ये आज रंगणार दुसरा सराव सामना
By admin | Published: January 12, 2017 1:26 AM