चंडीगड : यूएईत आयोजित प्रस्तावित भारत-पाक क्रिकेट मालिकेच्या भविष्याबाबत उलटसुलट चर्चेला ऊत आला असताना बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी मालिका आयोजनासाठी चर्चेची दुसरी फेरी लवकरच होणार असल्याचे संकेत दिले. उभय देशांत सहमतीचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी पीसीबीप्रमुख शहरयार खान यांनी नुकताच भारत दौरा केला. त्यांनी कोलकाता येथे बीसीसीआय अध्यक्षांसोबत घेतलेल्या संयुक्त पत्रपरिषदेत तीन कसोटी, पाच वन डे आणि दोन टी-२० सामन्यांचा प्रस्ताव ठेवला. बीसीसीआयने मात्र कुठलीही घाई न करता सावध पवित्रा घेण्याचे ठरविले आहे. गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना ठाकूर म्हणाले, ‘येत्या काही दिवसांत किंवा काही आठवड्यांत चर्चेची दुसरी फेरी होईल. उभय देशांमधील चर्चा सध्या प्राथमिक अवस्थेत आहे. मालिकेवर अद्याप निर्णय झाला नाही; पण लोकसभेत प्रश्न उपस्थित झाला. काही चॅनेल्सनी हा चर्चेचा मुद्दा बनवून टाकला.’ मालिकेच्या आयोजनाबद्दल बीसीसीआयची स्थिती स्पष्ट करताना ठाकूर पुढे म्हणाले, ‘मी इतकेच सांगेन, की उभय देशांमधील बोर्डांत चर्चा सुरू झाली असून ती प्राथमिक अवस्थेत आहे. उभय बोर्डात केवळ क्रिकेटवरच चर्चा केली जाते.’पीसीबी-टेन स्पोर्ट्स करारावर बीसीसीआयच्या विरोधाबाबत विचारताच ठाकूर म्हणाले, ‘याबाबत पीसीसीबीसोबत बोलणी सुरू आहे. भविष्यात भारत पाकला आमंत्रित करू शकतो का, असे विचारताच ठाकूर यांनी, ‘सध्यातरी भारत पाक दौरा करणार आहे. नंतरचे नंतर पाहू,’ असे उत्तर दिले. (वृत्तसंस्था)
चर्चेची दुसरी फेरी लवकरच : ठाकूर
By admin | Published: May 15, 2015 1:01 AM