नवी दिल्ली : देशासाठी सुवर्णासह पाच पदके जिंकणा-या बधिर आॅलिम्पिकपटूंना सरकारने सापत्न वागणूक दिली. त्या निषेधार्थ खेळाडूंनी विमानतळावरच धरणे देत सापत्न वागणुकीचा निषेध केला. पॅरा अॅथलिट्सप्रमाणे आम्हालादेखील सन्मान मिळावा, अशी पदकविजेत्यांची मागणी आहे. या खेळाडूंच्या स्वागतासाठी क्रीडा मंत्रालयाचा एकही अधिकारी उपस्थित नव्हता, हे विशेष.१८ ते ३० जुलै या काळात तुर्कस्तानातील सॅमसून येथे झालेल्या बधिरांच्या आॅलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी एका सुवर्णासह पाच पदके जिंकली. मायदेशात हे खेळाडू दाखल झाले तेव्हा मात्र स्वागतसाठी कुणीही हजर नसल्याने, या खेळाडूंनी नवी दिल्ली विमानतळ सोडण्यास नकार देत तेथेच धरणे आंदोलन केले. नंतर क्रीडा सचिव इंजेती श्रीनिवास यांची भेट घेत या खेळाडूंनी मागण्या सादर केल्या. बधिर खेळाडूंना पॅरा अॅथलिट्ससारखी वागणूक मिळायला हवी, अशी त्यांची मागणी होती. वीरेंद्र कुमार याने ७४ किलो फ्री स्टाइल कुस्तीचे सुवर्ण जिंकले.त्याचे कोच महासिंग राव म्हणाले, ‘श्रीनिवास यांनी हे प्रकरण मंत्रालयासमक्ष ठेवण्याची हमी दिली आहे.’ गुरू हनुमान आखाड्याचे प्रशिक्षक राव पुढे म्हणाले, ‘क्रीडा सचिवांनी आमची व्यथा जाणून घेतली. हा मुद्दा क्रीडा मंत्रालयाच्या समितीपुढे ठेवण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे. याशिवाय बधिर खेळाडूंना साईतील सुविधांचा वापर करण्यास परवानगी मिळावी, अर्जुन पुरस्कारासाठी बधिर खेळाडूंच्या नावाची शिफारस व्हावी आणि या खेळाडूंना आर्थिक प्रोत्साहन रक्कम मिळावी या मागण्यादेखील मांडण्यात आल्या. वीरेंद्र कुमार याला आधीच अर्जुन पुरस्कार मिळाला असल्याने, तो अन्य एका बधिर मल्लाची या पुरस्कारासाठी शिफारस करू इच्छितो.’ (वृत्तसंस्था)
सरकारकडून बधिर आॅलिम्पिकपटूंना सापत्न वागणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 1:24 AM