ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 17 - भारत-पाकिस्तानमधील वादग्रस्त मुद्यांवर नेहमीच भारताची बाजू उचलून धरणा-या विरेंद्र सेहवागने एका विषयावर मात्र पाकिस्तानी कर्णधार सर्फराज अहमदचे समर्थन केले आहे. सर्फराजला इंग्रजी बोलता येत नसल्याने त्याची खिल्ली उडवणा-यांचा सेहवगाने आपल्या टि्वटमधून समाचार घेतला आहे.
सामन्यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत सर्फराजला इंग्रजी बोलता न आल्याने टि्वटरवर त्याला अत्यंत वाईट पद्धतीने ट्रोल करण्यात आले. सर्फराज या संपूर्ण वादावर काहीही बोलला नसला तरी, सेहवागने मात्र त्याचा बचाव केला आहे. सर्फराजला इंग्रजी बोलता येत नाही म्हणून त्याची खिल्ली उडवणे वेडेपणा आहे.
क्रिकेट खेळण्याचे त्याचे काम होते. पाकिस्तानला अंतिम फेरीत पोहोचवून त्याने त्याची जबाबदारी उत्तमरित्या निभावली असल्याचे सेहवागने त्याच्या टि्वटमध्ये म्हटले आहे. उद्या रविवारी भारत आणि पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना होणार आहे. साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानवर 124 धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. त्यानंतर पाकिस्तानने आपल्या कामगिरीत सुधारणा केली. एकपाठोपाठएक विजय मिळवत त्यांनी अंतिम फेरी गाठली.
काय म्हणाला कोहली
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये उद्या पाकिस्तान विरुद्ध होणा-या फायनलसाठी टीम इंडिया पूर्णपणे सज्ज असून, देशावासियांना आमच्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षांचे ओझे कसे हाताळायचे ते आम्हाला चांगले ठाऊक आहे असे कर्णधार विराट कोहलीने सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. गेल्या काहीवर्षांपासून मी या परिस्थितीतून जातोय. जेव्हा तुम्ही मैदानावर उतरता तेव्हा या गोष्टी तुमच्या डोक्यात नसतात असे कोहलीने सांगितले.
काय म्हणाला सर्फराज
उद्या भारताविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत आक्रमक आणि सकारात्मक क्रिकेट खेळू असे पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदने म्हटले आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकारपरिषदेत बोलताना सर्फराजने आक्रमक क्रिकेट खेळण्याला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. युवा खेळाडूंची चांगली कामगिरी हे संघासाठी चांगेल चिन्ह असल्याचे त्याने सांगितले.
फहीम अश्रफ, रुमान रईस आणि फाखार झामान या तिघांनी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. पाकिस्तानी संघ मॅच फिक्सिंग करुन अंतिम फेरीत पोहोचलाय या आमिर सोहेलच्या आरोपाबद्दल विचारले असता सर्फराजने आम्ही आता या गोष्टीचा विचार करत नाहीय असे उत्तर दिले.
His job doesn't demand to know English but to beat the English & they did really well to beat a strong English side.
Kal,Hindustan Zindabad! https://t.co/cuhpjiC515— Virender Sehwag (@virendersehwag) June 17, 2017