ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - मैदानावर जोरदार फलंदाजी करून गोलंदाजांच्या तोंडचं पाणी पळवणार सेहवाग सध्या सोशल नेटवर्किंग साईटवरही तूफान फलंदाजी करताना दिसतो. रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय क्रीडापटूंच्या प्रदर्शनानंतर इंग्लंडमधील पत्रकार पिअर्स मॉर्गन आणि माजी भारतीय क्रिकेटपटून वीरेंद्र सेहवाग यांच्यादरम्यान झालेले वाकयुद्ध सर्वांच्याच लक्षात असेल. मॉर्गनला सणसणीत प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर काल 'विश्वचषक कबड्डी स्पर्धे'त भारताने इंग्लंडचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. तीच संधी साधून वीरूने इंग्रजांना पुन्हा डिवचले आहे. ट्विटरवरून त्याने भारताच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त करतानाच ' इंग्लंडची' हुर्यो उडवली आहे. ' वर्ल्डकपमध्ये इंग्लंडचा पुन्हा पराभव. (आता) फक्त खेळ बदलला. यावेळी कबड्डीत (इंग्लंड) पराभूत. ' असे ट्विट वीरूने केले.
England loose in a World Cup again.Only the sport changes.This time it's Kabaddi.India thrash them 69-18.All the best for semis #INDvENG— Virender Sehwag (@virendersehwag) October 18, 2016
अहमदाबाद येथे रंगलेल्या सामन्यात भारताने विश्वचषक कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश करताना इंग्लंडला ६९-१८ असे लोळवले. अत्यंत एकतर्फी झालेल्या या लढतीत भारताने अपेक्षित विजय मिळवताना इंग्लंडला सहजपणे नमवले. उपांत्य फेरी निश्चित करण्यासाठी भारतीयांना विशेष मेहनत घ्यावी लागली नाही. इंग्लंडचा दुबळा बचाव आणि कमजोर आक्रमण याचा चांगलाच समाचार घेताना भारतीयांनी इंग्लंडला कबड्डीचे धडेच दिले.
दरम्यान यापूर्वीही वीरूने भारतीयांची खिल्ली उडवणा-या इंग्रजांना चांगलेच सुनावले होते. - रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय क्रीडापटूंनी जिंकलेल्या पदकांवरून इंग्लंडमधील पत्रकार पिअर्स मॉर्गनने खिल्ली उडवली होती. मॉर्गनने ट्विटरवरून ऑलिम्पिक मेडल्सचा विषय कढत माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागला डिवचत त्याला आव्हान दिले होते. 'इंग्लंडने वर्ल्डकप जिंकायच्या आधी भारताने ऑलिम्पिकमध्ये आणखी एक सुवर्णपदक मिळवून दाखवलं तर, मी दहा लाख रुपये समाजसेवेसाठी देईन, सेहवाग तुला हे आव्हान मान्य आहे?' असे ट्विट त्याने केले होते. त्यावर वीरूनेही त्याला सणसणीत प्रत्युत्तर दिले.
' मॉर्गन, भारताकडे आधीच नऊ सुवर्णपदकं आहेत, (पण) इंग्लंडकडे एकही वर्ल्डकप नाही. आणि चॅरिटीविषयीच बोलायचं झालं तर, तुम्हीच (इंग्रज) आम्हाला "कोहिनूर" देणं लागता' असे ट्विट करत सेहवागने त्याला सुनावले