ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - मिताली राजच्या भारतीय महिला क्रिकेट संघाला वर्ल्डकपच्या अंतिम लढतीत इंग्लंडकडून 9 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. यासोबतच महिला विश्वचषकात स्वप्नवत कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला संघाचे विश्वचषकाला गवसणी घालण्याचे स्वप्नही भंगले. संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाला निर्णायक लढतीत पराभव पत्करावा लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे. पण त्याचबरोबर भारतीय महिला संघातील मर्दानींचे कौतुकही करण्यात येत आहे. हीच संधी साधत ब्रिटिश पत्रकार पिअर्स मॉर्गन याने विरेंद्र सेहवागवर निशाणा साधला आणि दोघांमध्ये तूतू-मैमै सुरू झाली.
भारतीय संघाच्या पराभवानंतर पिअर्स मॉर्गन याने सेहवागला टॅग करून काय मित्रा तू ठिक आहेस काय असा सवाल केला. त्याला उत्तर देताना आपल्या हजरजबाबीपणासाठी ओळखल्या जाणा-या सेहवागने पुन्हा एकदा बाजी मारली.
या पराभवानंतरही मला आणि माझ्या देशाला आमच्या महिला खेळाडूंवर गर्व आहे... आमच्या संघाने कडवी टक्कर दिली... यामुळे आमच्या क्रिकेटमध्ये भविष्यात मोठी सुधारणा होण्यास मदत झाली आहे... काहीसा बदल म्हणून मिळालेला विजय तू एन्जॉय कर.. असं ट्विट सेहवागने केलं.
सेहवाग आणि मॉर्गन यापुर्वीही ट्विटरवर भिडले आहेत. रिओ ऑलिम्पिकनंतर सव्वाशे कोटी लोकसंख्येचा भारत रिओ ऑलिम्पिकमध्ये मिळालेल्या केवळ दोनच पदकांवर सेलिब्रेशन करत आहे, किती लज्जास्पद आहे. अशी कॉमेंट ब्रिटिश पत्रकार पिअर्स मॉर्गन यांनी केली होती. त्याला माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवाग आणि लेखक चेतन भगतने खास शैलीत उत्तर दिलं होतं. भारत प्रत्येक छोट्या-मोठ्या क्षणाचा आनंद घेणारा देश आहे. क्रिकेटचा निर्माता इंग्लंडला अजून एक विश्वकप देखील जिंकता आला नाही. तरीही अजून क्रिकेट खेळत आहे. हे लज्जास्पद नाही का, अशा शब्दात विरुने षट्कार लगावला होता.
रेल्वेतील महिला क्रिकेटपटूंना पदोन्नती : प्रभू यांची घोषणा-
नवी दिल्ली : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज भारतीय महिला वर्ल्डकप संघातील जे खेळाडू रेल्वेत आहेत अशांसाठी पदोन्नतीची घोषणा केली आहे. भारतीय संघातील १५ खेळाडूंपैकी १0 क्रिकेटपटू रेल्वेत आहेत. त्यात कर्णधार मिताली राज आणि उपकर्णधार हरमनप्रीत कौर यांचादेखील समावेश आहे.
वेळेआधी पदोन्नती देण्याशिवाय या क्रिकेटपटूंना रोख पारितोषिकेही दिली जाणार आहेत. रेल्वे क्रीडा प्रमोशन बोर्डाच्या सचिव रेखा यादव म्हणाल्या, ‘‘रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी भारतीय संघाला शुभेच्छा पाठवल्या आहेत. त्यांनी रेल्वेत असणाऱ्या महिला क्रिकेटपटूंना पदोन्नती देण्याची घोषणा केली आहे. त्यांना
रोख पारितोषिकेही दिली जाणार आहेत.’’
मिताली राज आणि हरमनप्रीत यांच्यासह रेल्वेत असणाऱ्या एकता बिष्ट, पूनम राऊत, वेदा कृष्णमूर्ती, पूनम यादव, सुषमा वर्मा, मोना मेश्राम, राजेश्वरी गायकवाड आणि नुजहत परवीन या भारतीय संघात आहेत.