ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. १७ - भारतीय संघात 'सर जाडेजा' नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू रविंद्र जाडेजाने नुकतीच 'गीर' अभयारण्याला भेट दिली असून तेथील काही फोटोही सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. मात्र आता याचा फोटोंमुळे तो अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. जाडेजाने त्याच्या पत्नीसह 'गीर' अभयारण्यात अतिउत्साहाच्या भरात तेथील सिंहासोबत सेल्फी काढून ते फोटो सोशल मीडियावर अपलोड केले असून याप्रकरणी वनविभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत.
जंगल सफारीदरम्यान रविंद्र जाडेजा व त्याची पत्नी गाडीतून खाली उतरले व अवघ्या काही अंतरावर बसलेल्या सिंहांच्या झुंडीसोबत फोटो काढले. तेच काही सेल्फीही काढले. अभयारण्याच्या नियमानुसार जंगलाच्या आतमध्ये असताना कोणत्याही पर्यटकाला गाडीतून खाली उतरण्याची परवानगी नसते, मात्र जडेजा व त्याची पत्नीने फक्त याच नियमाचे उल्लंघन केले नाही तर खाली उतरून सिंहांसोबत फोटोही काढले, जे अतिशय धोकादायक ठरू शकते. ही सर्व छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर टीका होण्याची शक्यता लक्षात घेऊनच वन विभागाच्या अधिका-यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.