ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 13 - पावसाच्या कृपेमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केलेल्या बांगलादेशच्या संघाचा सामना 15 जूनला भारतासोबत होणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही सामन्यात पावसाने व्यत्यय आणला, ज्याचा फायदा बांगलादेशला झाला आणि त्यांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यासाठी प्रवेश नक्की झाल्यानंतर बांगलादेशच्या संघाने जल्लोष केला. यावेळी त्यांनी बांगलादेशी व्हर्जनमधील ‘हम होंगे कामयाब…’ या गाण्यावर जोरदार सेलिब्रेशन केलं. जल्लोष करतानाचा व्हिडीओ बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तस्कीन अहमद याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. आशिया कप दरम्यान याच तस्किन अहमदच्या हातात त्यावेळचा भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचं शीर असलेला फोटो बांगलादेशमधून व्हायरल झाला होता. त्यापुर्वी बांगलादेशमध्ये झालेल्या मालिकेत भारताचा पराभव केल्यानंतर भारतीय संघाचं अर्धमुंडन केल्याचा फोटो बांगलादेशमधून व्हायरल करण्यात आला होता. मात्र आशिया कपमध्ये टीम इंडियाने बांगलादेशला पराभवाची धूळ चारुन पोस्टरला चोख उत्तर दिलं होतं.
तर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी झालेल्या सराव सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशला आपली जागा दाखवली होती. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशचा अख्खा संघ केवळ 84 धावात गुंडाळून 240 धावांनी विजय साजरा केला.
सेमीच्या लढाईपूर्वी बांगलादेशच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्टर्सचा उच्छाद मांडला आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली, हार्दिक पंड्या, धोनीसह सर्वच संघाचे अक्षेपार्ह पोस्टर्स बांगलादेशी चाहत्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.