न्यूयॉर्क : कॅलेंडर ग्रँडस्लॅम पूर्ण करण्याच्या इराद्याने अमेरिकन टेनिस (यूएस) स्पर्धेत उतरलेल्या अव्वल मानांकित सेरेना विल्यम्सने आपले पहिले पाऊल दमदारपणे टाकले असून रशियाच्या वितालिया दियाशेंको हिला हरवून तिने विजयी सलामी दिली. ग्रँडस्लॅम स्पर्धेत सेरेनाचा हा सलग २९ वा विजय आहे. पुरुषांच्या गटात जागतिक क्रमवारीत नंबर वन असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोविच आणि स्पेनच्या राफेल नदालने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. तीन वेळेची यूएस ओपन चॅम्पियन सेरेनाने केवळ ३० मिनिटांत ६-०, २-० असा विजय मिळविला. दुखापतीमुळे वितालियाने सामना अर्धवट सोडून दिला. १९८८ मध्ये स्टेफी ग्राफने कॅलेंडर ग्रँडस्लॅम मिळविले होते, याची बरोबरी करण्याचा सेरेनाचा इरादा आहे. सेरेनाचा आता पुढील सामना पात्रता फेरीतून आलेली डच खेळाडू किकी बर्तेस हिच्याशी होईल. बर्तेसने क्रोएशियाच्या लुसिच बरोनी हिला हरवून पहिली फेरी जिंकली आहे. पुरुष गटात अव्वल मानांकित नोवाक जोकोविच दुसऱ्या फेरीत पोहोचला आहे; परंतु गत उपविजेता जपानचा केई निशिकोरी पराभूत होऊन पहिल्याच फेरीतून स्पर्धेबाहेर पडला. ब्राझीलच्या जोओ सूजा याला ६-१, ६-१, ६-१ असे हरविण्यासाठी एक तास ११ मिनिटे वेळ पुरला. निशिकोरीला फ्रान्सच्या बेनोईत पेईरे याने ६-४, ३-६, ४-६, ७-६ आणि ६-४ असे हरविले. क्रोएशियाच्या मारिन सिलीच याने अर्जेंटिनाच्या पात्रता फेरीतील विजेता गुईडो पेला याला ६-३, ७-६, ७-६ असे हरविले. दुसरीकडे आठवा मानांकित आणि १४ वेळचा ग्रँडस्लॅम विजेता राफेल नदालने क्रोएशियाच्या बोर्ना कोरिचला चुरशीच्या झालेल्या लढतीत ६-३, ६-२, ४-६, ६-४ असे पराभूत केले. (वृत्तसंस्था)
सेरेना, जोकोविच, नदालची विजयी सलामी
By admin | Published: September 01, 2015 10:10 PM