न्यूयॉर्क : जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू अमेरिकेच्या सेरेना विलियम्सनला चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोव्हाविरुद्ध उपांत्य फेरीत धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. अमेरिकन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीतील या निकालामुळे सेरेनाला क्रमवारीत अव्वल स्थान गमवावे लागले. सेरेनाचे आव्हान संपुष्टात आल्यामुळे प्लिस्कोव्हा व जर्मनीची एंजेलिक केर्बर यांच्यादरम्यान जेतेपदासाठी अंतिम झुंज रंगणार आहे. दुसऱ्या उपांत्य लढतीत केर्बरने डेन्मार्कच्या कॅरोलिन व्होज्नियाकीचा पराभव केला. गुरुवारी खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत अव्वल मानांकित सेरेनाला १० व्या मानांकित प्लिस्कोव्हाविरुद्ध ६-२, ७-६ ने पराभव स्वीकारावा लागला. यूएस ओपनच्या उपांत्य फेरीत सेरेनाला सलग दुसऱ्यांदा पराभव स्वीकारावा लागला. प्लिस्कोव्हा आता जस्टिन हेनिन, किम क्लिजस्टर्स व मार्टिना हिंगीसनंतर ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत विलियम्स भगिनींचा पराभव करणारी चौथी खेळाडू ठरली. विक्रमी २२ ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकावणाऱ्या सेरेनाला पहिल्या सेटमध्ये सूरच गवसला नाही. या सेटमध्ये तिला केवळ दोन पॉर्इंट घेता आले. दुसऱ्या सेटमध्ये टायब्रेकमध्ये मॅच पॉर्इंट असताना सेरेनाने दुहेरी चूक केली. त्यामुळे जागतिक क्रमवारीत ११ व्या स्थानावर असलेल्या प्लिस्कोव्हाने दुसऱ्या सेटमध्ये सरशी साधत संस्मरणीय विजयाची नोंद केली. टायब्रेकमध्ये सेरेना सुरुवातीला ३-० ने पिछाडीवर होती, पण त्यानंतर तिने कामगिरी सुधारत ३-३ अशी बरोबरी साधली. अखेर दुहेरी चूक केल्यामुळे तिला सामना गमवावा लागला. स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य लढतीत आॅस्ट्रेलियन ओपन विजेती जर्मनीच्या एंजेविलक केर्बरने जागतिक क्रमवारीतील माजी नंबर वन खेळाडू डेन्मार्कच्या कॅरोलिन व्होज्नियाकीचा ६-४, ६-३ ने पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. या विजयासह केर्बरने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या अमेरिकेच्या सेरेना विलियम्सला पिछाडीवर सोडत अव्वल स्थान पटकावले. केर्बरने यंदा जानेवारी महिन्यात आॅस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद तर जुलै महिन्यात विम्बल्डनमध्ये उपविजेतेपद पटकावले होते. १९९६ मध्ये स्टेफी ग्राफनंतर यूएस ओपनमध्ये अंतिम फेरी गाठणारी जर्मनीची पहिली महिला खेळाडू ठरली. ग्राफनेही अव्वल स्थान भूषवले आहे. २८ वर्षीय केर्बर डब्ल्यूटीए टेनिस इतिहासात अव्वल स्थान पटकावणारी जगातील २२ वी खेळाडू ठरली आहे. रिओमध्ये केर्बरने रौप्यपदक पटकावले आहे. विजयानंतर केर्बर म्हणाली, ‘जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावित अंतिम फेरी गाठण्यात यश आल्यामुळे आनंद झाला. आजचा दिवस संस्मरणीय आहे.’ (वृत्तसंस्था)>या पराभवामुळे सेरेनाचे केवळ २३ वे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकाविण्याचे स्वप्न भंगले नसून रँकिंगमध्ये सलग १८६ आठवडे अव्वल स्थानावर राहण्याचा विक्रमही खंडित झाला. आता डेन्मार्कच्या कॅरोलिन व्होज्नियाकीचा पराभव करणारी जर्मनीची एंजेलिक केर्बरने जागतिक क्रमवारीत अव्वल महिला खेळाडू होण्याचा मान मिळविला आहे.
सेरेना.. हरली ना..!
By admin | Published: September 10, 2016 3:36 AM