मेलबोर्न : जागतिक महिला टेनिस क्रमवारीतील अव्वल खेळाडू व गतविजेती सेरेना विलियम्स आणि नंबर वन पुरुष खेळाडू सर्बियाचा नोव्हाक जोकोविच यांनी या वर्षातील पहिल्या ग्रॅण्डस्लॅम आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये जेतेपद राखण्याच्या दिशेने यशस्वी सुरुवात केली. सेरेना व नोव्हाक यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत सोमवारी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. स्लोएन स्टिफन्स व सारा इराणी यांना मात्र पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला. पुरुष विभागात गतचॅम्पियन व अव्वल मानांकित जोकोवीचने सलामी लढतीत दक्षिण कोरियाच्या चुंग हियोनचा ६-३, ६-२, ६-४ ने सहज पराभव केला. मेलबोर्न पार्कमध्ये ३५ अंश तापमानात खेळताना सर्बियन खेळाडूने या लढतीत एकूण ४० विनर्स लगावले, तर चुंगला केवळ १६ विनर्स लगावता आले. पुरुष एकेरीतील अन्य महत्त्वाच्या सामन्यांमध्ये १४व्या मानांकित फ्रान्सच्या जाइल्स सिमोनने कॅनडाच्या वासेक पोसपिसिलचा ६-७, ६-३, ६-२, ६-४ ने, १२व्या मानांकित क्रोएशियाच्या मारिन सिलिचने हॉलंडच्या थिएमो डी बाकेरचा ६-७, ७-५, ६-२, ६-४ ने, १५व्या मानांकित बेल्जियमच्या डेव्हिड गोफेनने युक्रेनच्या सर्गेई स्टाकोवस्कीचा ३-६, ६-३, ६-४, ६-४ने, सातव्या मानांकित जपानच्या केई निशिकोरीने जर्मनीच्या फिलिप कोलश्रेबरचा ६-४, ६-३, ६-३ ने पराभव केला. २२व्या मानांकित क्रोेएशियाच्या इवो कोर्लोवीचने तिसऱ्या सेटनंतर सामन्यातून माघार घेतली. त्यामुळे अर्जेंटिनाचा प्रतिस्पर्धी खेळाडू फेडरिको डेलबोनिसचा दुसऱ्या फेरीचा मार्ग मोकळा झाला. महिला विभागात पहिल्या फेरीत चौथे मानांकन प्राप्त पोलंडची अॅग्निस्का रदवांस्काने अमेरिकेच्या ख्रिस्टिना मॅकहेलचा ६-२, ६-३ने, तर सहाव्या मानांकिच चेक प्रजासत्ताकच्या पेत्रा क्वितोव्हाने थायलंडच्या लुकसिका कुमकुमचा ६-३, ६-१ने, स्वित्झर्लंडच्या १२व्या मानांकित बेलिंडा बेनसिसने अमेरिकेच्या एलिसन रिस्केचा ६-४, ६-३ने आणि १३व्या मानांकित इटलीच्या रॉबर्टा विन्सीने आॅस्ट्रियाच्या तामिरा पास्जेकचा ६-४, ६-२ने पराभव केला. (वृत्तसंस्था)
सेरेना, नोव्हाकची विजयी सलामी
By admin | Published: January 19, 2016 3:24 AM