व्हँकूवर : दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्स आई बनल्यानंतर कोर्टवर पुनरागमन करणार आहे. माझे बाळ माझी प्रेरणा बनेल, असा आशावाद सेरेनाने व्यक्त केला.काल एका खुल्या चर्चासत्रात सेरेनाने दिलखुलास गप्पा केल्या. ती म्हणाली,‘गर्भावस्थेची प्रगती काय आहे, हे जाणून घेण्यासाठी मी दर आठवड्याला फोटो घेण्याची सवय लावून घेतली आहे. हे एक प्रकारचे दस्तावेज ठरावेत. त्यातच एक दिवस सोशल मीडियावर स्वीम सूटमध्ये चुकीने फोटो पोस्ट केला होता. तो फोटो पोस्ट होईस्तोवर मी आई बनणार हे काही लोकांनाच माहिती होते.’सोशल मीडियावर काय घडते, असे हसून सांगताना सेरेना पुढे म्हणाली,‘मी चुकीचे बटन दाबले आणि जगभर चर्चा सुरू झाली. मी आधी गुप्तता पाळली होती, पण एक चूक नडली आणि खुलासा झाला. मी गर्भवती आहे हे आॅस्ट्रेलियन ओपनच्या दोन दिवसांआधी कळले. वर्षातील पहिले ग्रॅण्डस्लॅम जेतेपद पटकविले होते. खेळत राहणे हे माझ्यासाठी आणि बाळासाठी किती धोकादायक असू शकते याची कल्पना नसल्याने मी नर्व्हस होते. थकवा आणि तणाव स्वत:वर हावी होऊ न देता मी वेगळ्या डावपेचानुसार खेळले. मी स्पर्धा जिंकावी, अशी अनेकांची इच्छा होती. मी आई बनणार आहे हे यापैकी काहींनाच माहिती होते.’सेरेनाने जानेवारीत आॅस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये मोठी बहीण व्हीनस विल्यम्सला नमवून जेतेपदावर शिक्कामोर्तब केले होते. याविषयी ती म्हणाली,‘व्हीनसविरुद्ध खेळणे म्हणजे स्वत:विरुद्ध खेळण्यासारखेच आहे. कोर्टवर आम्ही एकमेकींच्या कडव्या प्रतिस्पर्धी आहोत. कोर्टबाहेर मात्र आमच्यात मैत्रिणीसारखे नाते आहे.’‘मला हरणे पसंत नाही. मी नेहमी जिंकू इच्छिते. पण पराभव मिळाला तर त्यातून शिकण्यासारखे बरेच काही असते. भविष्यात चुकांची पुनरावृत्ती करू नका, असा संदेश पराभव देत असतो,’ असे सेरेनाने एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.सेरेना सप्टेंबर महिन्यात आई बनेल. त्याच महिन्यात ती वयाची ३६ वर्षे पूर्ण करणार आहे. टेनिसमधील भविष्याबाबत ती म्हणाली,‘मी निश्चितपणे पुनरागमन करणार आहे. बाळ स्टॅन्डमध्ये राहील. ते रडणार नाही व मला प्रोत्साहन देईल, अशी अपेक्षा आहे.’ सेरेनाने गत सप्टेंबरमध्ये व्यावसायिक अॅलेक्सिस ओवाहनियन याच्यासोबत वाङ्निश्चय झाल्याची घोषणा केली होती. यंदा सेरेना कुठल्याही स्पर्धेत खेळली नाही. भावी आयुष्यात बाळ, फिटनेस, टेनिस, तसेच फॅशन व्यवसाय या सर्वांवर लक्ष केंद्रित करायचे असल्याचे सेरेनाने सांगितले. (वृत्तसंस्था)
आई बनल्यानंतर सेरेना कोर्टवर परतणार
By admin | Published: April 27, 2017 12:47 AM