न्यूयॉर्क : सेरेना विलियम्सने पहिला सेट गमाविल्यानंतर शानदार पुनरागमन करीत यूएस ओपन टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीत स्थान मिळवत विक्रमी २४ व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाकडे आश्वासक पाऊल टाकले.
पुरुष विभागात दुसरे मानांकन प्राप्त डोमिनिक थीम व तिसरे मानांकन प्राप्त दानिल मेदवेदेव यांनीही उपांत्य फेरीत धडक मारली. सेरेनाने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत बुल्गारियाच्या बिगरमानांकित स्वेताना पिरिनकोव्हाविरुद्ध पहिला सेट गमावला होता, पण त्यानंतर दोन तासापेक्षा अधिक काळ रंगलेल्या लढतीत तिने पिरिनकोव्हाचा ४-६, ६-३, ६-२ ने पराभव केला. पुरुष विभागात उपांत्यपूर्व फेरीत गेल्या वर्षीचा उपविजेता दानिल मेदवेदेवने मायदेशातील सहकारी रशियन खेळाडू व १० वे मानांकन प्राप्त आंद्रेई रुबलेवचा ७-६ (६), ६-३, ७-६(५) पराभव केला. दुसरे मानांकन प्राप्त आॅस्ट्रियाई खेळाडू थीमला मात्र आॅस्ट्रेलियाच्या २१ व्या मानांकित अॅलेक्स डी मिनौरला ६-१, ६-२, ६-४ ने पराभूत करताना कष्ट पडले नाहीत. (वृत्तसंस्था)
त्य फेरीत सेरेनाला व्हिक्टोरिया अजारेंकाच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. अजारेंका २०१३ नंतर प्रथमच यूएस ओपनच्या उपांत्य फेरीत पोहोचली आहे. बेलारूसच्या बिगरमानांकित अजारेंकाने बेल्जियमच्या १६ व्या मानांकित एलिस मर्टन्सचा ६-१, ६-० ने पराभव केला. महिला विभागात दुसरी उपांत्य लढत २०१८ ची चॅम्पियन नाओमी ओसाका व २८ वे मानांकन प्राप्त जेनिफर ब्राडी यांच्यादरम्यान खेळली जाणार आहे.