लंडन : महिला टेनिस विश्वात दबदबा निर्माण करणाऱ्या अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने ‘विम्बल्डन’वर आपलेच राज असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. स्पर्धेच्या एकेरीतील अंतिम सामन्यात तिने स्पेनच्या गार्बिन मुगूरुजावर एकतर्फी मात करीत सहाव्यांदा विम्बल्डन चषक पटकाविला. एवढेच नव्हे, तर कारकीर्दीतील तिचे हे २१ वे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद ठरले. त्यामुळे ग्रॅण्डस्लॅमवर सध्यातरी सेरेनाचेच वर्चस्व दिसून येते. चारही ग्रॅण्डस्लॅम जिंकणाऱ्या शर्यतीत ती सर्वात आघाडीवर आहे. याआधी सेरेनाने २००२-०३ मध्येही सुद्धा हा प्रताप केला होता. या वर्षी आॅस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन आणि विम्बल्डनचा मुकूट पटकाविणाऱ्या सेरेना आता अमेरिकन ओपनचा किताबही जिंकण्यासाठी मैदानात उतरेल. तिने हा किताबही पटकािवला तर ती १९९८ मध्ये स्टेफी ग्राफ हिच्यानंतर कॅलेंडर ग्रॅण्ड पूर्ण करणारी पहिली खेळाडू ठरेल. सामन्यात, सरेनाने संथ आणि संयमी सुरुवात केली होती. त्यानंतर मात्र आक्रमक खेळ करीत सेरेनाने २० व्या मानांकित मुगूरुजा हिचा सरळ सेटमध्ये म्हणजे ६-४, ६-४ ने पराभव करीत विजेतेपद पटकाविले. हा सामना एक तास २२ मिनिटांपर्यंत चालला. विजयानंतर सेरेना म्हणाली, निश्चितच सुवर्ण क्षण आहे. गार्बिनने सुद्धा चांगला खेळ केला. अखेरच्या क्षणामध्ये तिने चांगली टक्कर दिली. तिच्यासोबत खेळताना सामना कधी संपला हे कळले नाही. मला विश्वास आहे, की ती सुद्धा विम्बल्डन चषक जिंकेल. (वृत्तसंस्था)
सेरेनास्लॅम!
By admin | Published: July 12, 2015 3:56 AM