कानपूर : केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळेपर्यंत पाकिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका होऊ शकत नाही; परंतु त्यांना विश्व टी-२0 चॅम्पियनशिपदरम्यान पाकिस्तानी संघाच्या धर्मशाला येथे खेळण्याविषयी हिमाचल प्रदेशचे भाजप नेते शांता कुमार यांच्या कायदा, सुव्यवस्था विस्कळीत होण्याच्या शंकेला राजकारणाशी जोडले जाऊ नये, असे आयपीएल आयुक्त राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केले.शुक्ला रविवारी सायंकाळी ग्रीन पार्क स्टेडियममध्ये एका स्थानिक क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.भाजप नेता शांता कुमार यांच्या धर्मशाला येथील टी-२0 सामन्यात पाकिस्तानी संघ खेळल्याने कायदा, सुव्यवस्था विस्कळीत होण्याच्या उपस्थित केलेल्या शंकेविषयी शुक्ला म्हणाले की, ‘क्रिकेटला राजकारणाशी जोडू नका. पाकिस्तानी संघ भारतात क्रिकेट खेळण्यासाठी फक्त आयसीसीप्रती आपल्या कटिबद्धतेमुळे येत आहे. पाकिस्तानसोबत भारताच्या द्विपक्षीय मालिकेबाबत जो विषय आहे, तो बीसीसीआय अशी मालिका खेळू इच्छिते; परंतु जोपर्यंत केंद्र सरकार मान्यता देत नाही, तोपर्यंत पुढचे पाऊल टाकता येणार नाही.’लोढा समितीविषयी बोलताना त्यांनी बीसीसीआयचे वकील ३ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात लोढा समितीवर आपली बाजू मांडतील, असे सांगितले.(वृत्तसंस्था)
केंद्राची मान्यता मिळेपर्यंत होऊ शकत नाही पाकविरुद्ध मालिका
By admin | Published: February 29, 2016 2:39 AM