कराची : भारतासोबतचे द्विपक्षीय क्रिकेटसंबंध मोडीत काढण्याची धमकी देणाऱ्या पाक क्रिकेट बोर्डाने मालिकेच्या आयोजनाआधी काही मुद्यांची सोडवणूक करण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्याशिवाय डिसेंबरमध्ये उभय देशांत मालिकेचे आयोजन शक्य नसल्याचा पुनरुच्चार आयपीएल आयुक्त राजीव शुक्ला यांनी सोमवारी केला.बीसीसीआयमधील प्रभावी व्यक्तिमत्त्व असलेले शुक्ला यांनी पाकमधील जियो चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, ‘‘पीसीबी अध्यक्ष शहरयार खान यांनी दिलेली धमकी निरर्थक आहे. भारत-पाकमध्ये द्विपक्षीय मालिकेच्या आयोजनाबाबत जो करार आहे त्यात अनुकूल परिस्थितीत मालिका आयोजन करण्यात येईल, ही बाब अधोरेखित करण्यात आली आहे. सध्याची परिस्थिती पाहता डिसेंबरमध्ये मालिका आयोजन होऊ शकेल, असे वाटत नाही. भारत सरकारकडून परवानगी घेतल्यानंतरच पीसीबीसोबत काही मुद्दे निकाली काढावे लागतील. मालिकेचे आयोजन करण्याआधी काही मुद्यांवर तोडगा निघणे फारच गरजेचे असेल.’’शहरयार खान यांनी पाकविरुद्ध मालिका खेळण्यास भारताने नकार दिल्यास पाक बोर्ड भविष्यात आयसीसी आणि आशियाई क्रिकेट स्पर्धेतील भारताविरुद्धच्या सर्वच सामन्यांवर बहिष्कार टाकेल, अशी धमकी तीन दिवसांआधी दिली होती. यावर शुक्ला म्हणाले, ‘‘पाकने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतावर बहिष्कार टाकल्यास त्याविरुद्ध कारवाईसाठी आयसीसी नियम आहेतच. त्यासाठी कायदेशीर मार्ग अवलंबला जाईल. पाकसोबत सामान्य स्थितीत क्रिकेट खेळले जावे, अशी भारताची इच्छा आहे. सध्याच्या परिस्थितीत भारत-पाक क्रिकेटचे आयोजन शक्यच नाही.’’ भारताने २००७ पासून पाकसोबत द्विपक्षीय क्रिकेट खेळलेले नाही. सद्य:स्थितीत कुठलाही देश पाक दौरा करण्याच्या तयारीत नाही. दहशतवाद हा यामागे मोठा प्रश्न आहे.(वृत्तसंस्था)
डिसेंबरमध्ये मालिका आयोजन शक्य नाहीच
By admin | Published: September 29, 2015 12:08 AM