ग्रोस इसलेट : गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवताना यजमान वेस्ट इंडिजचा तिसऱ्या कसोटी सामन्यात तब्बल २३७ धावांनी धुव्वा उडवला. या दणदणीत विजयासह भारताने चार सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली असून सलग तिसऱ्यांदा कॅरेबियन जमिनीवर कसोटी मालिका जिंकली. भारताने यजमानांपुढे दुसऱ्या डावात विजयासाठी ३४६ धावांचे लक्ष्य ठेवले. मात्र गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना विंडिज संघाला ४७.३ षटकात केवळ १०८ धावांमध्ये गुंडाळले. मोहम्मद शमी (३/१५), इंशांत शर्मा (२/३०), रविंद्र जडेजा (२/२०), भुवनेश्वर कुमार (१/१३) आणि रविचंद्रन अश्विन (१/२८) यांनी दमदार मारा करत विंडिजला गुडघे टेकविण्यास भाग पाडले. मुंबईकर अजिंक्य रहाणेने (नाबाद ७८) झळकावलेल्या झुंजार अर्धशतकाच्या जोरावर भारताने आपला दुसरा डाव ७ बाद २१७ धावांवर घोषित करुन विंडिजपुढे विजयासाठी ३४६ धावांचे कठीण आव्हान उभे केले. या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडिजची विश्रांतीपर्यंत ३ बाद ५३ धावा अशी अवस्था झाली होती. यानंतर मात्र, भारतीयांनी भेदक मारा करताना यजमानांना पुर्णपणे दबावाखाली ठेवले.विंडिजची आघाडीची फळी स्वस्तात परतली. लिआॅन जॉन्सन (०), कार्लोस ब्रेथवेट (४) आणि अनुभवी मार्लोन सॅम्युअल्स (१२) झटपट परतल्याने विंडिजची सुरुवात अडखळती झाली होती. विश्रांतीनंतर डॅरेन ब्रावोने एकाकी किल्ला लढवताना दमदार ५९ धावांची खेळी केली. मात्र, दुसऱ्या बाजूने इतर फलंदाजांची योग्य साथ मिळत नसल्याने त्याची खेळी व्यर्थ गेली. विशेष म्हणजे अखेरचे ५ फलंदाज केवळ २४ धावांत परतल्याने यजमानांना सामन्यासह मालिकाही गमवावी लागली. तत्पूर्वी, भारताने ३ बाद १५७ धावांवरुन खेळण्यास सुरुवात केल्यानंतर रोहित शर्मा (४१) लगेच पायचीत बाद झाला. यानंतर पहिल्या डावातील शतकवीर वृध्दिमान साहा (१४), आणि अष्टपैलू आर. अश्विन (१) यांच्यासह अष्टपैलू जडेजा (१६) झटपट परतले. त्याचवेळी रहाणेने ११६ चेडूत ७८ धावांची नाबाद दमदार खेळी केली. कर्णधार कोहलीने संघाच्या २१७ धावा धावफलकावर लागल्यानंतर दुसरा डाव घोषित केला. मिग्युएल कमिन्सने चमदार गोलंदाजी करताना ४८ धावांत ६ फलंदाजांनी माघारी धाडले. यानंतर उर्वरीत सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी जबरदस्त वर्चस्व राखले. (वृत्तसंस्था)>संक्षिप्त धावफलक>भारत (पहिला डाव) : सर्वबाद ३५३ धावा.वेस्ट इंडिज (पहिला डाव) : सर्वबाद २२५ धावा.>भारत (दुसरा डाव) : ४८ षटकात ७ बाद २१७ धावा घोषित. (अजिंक्य रहाणे नाबाद ७८, रोहित शर्मा ४१; मिग्युएल कमिन्स ६/४८, रोस्टन चेस १/४१)वेस्ट इंडिज (दुसरा डाव) : ४७.३ षटकात सर्वबाद १०८ धावा. (डॅरेन ब्रावो ५९; मोहम्मद शमी ३/१५, रविंद्र जडेजा २/२०, इशांत शर्मा २/३०).>लक्षवेधीवेस्ट इंडिजविरुध्द त्यांच्याच भूमीत भारताने पहिल्यांदाच सलग तिसरी कसोटी मालिका जिंकली.कॅरेबियन धर्तीवर एकाच कसोटी मालिकेत दोन सामने जिंकण्याची भारताची पहिलीच वेळ.विंडिजविरुद्ध याआधीच्या दोन मालिका भारताने १-० ने जिंकल्या होत्या.भारताने आशियाबाहेर धावांच्या फरकाने मिळवलेला हा तिसऱ्या क्रमांकाचा मोठा विजय.
मालिका विजयाची हॅट्ट्रीक
By admin | Published: August 15, 2016 4:13 AM