विशाखापट्टणम : दुसऱ्या सामन्यात एकतर्फी विजय नोंदवित आत्मविश्वास बळावलेला भारतीय संघ उद्या (रविवारी) तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात श्रीलंकेवर पुन्हा एकदा विजय मिळविण्यासह मालिका जिंकण्याच्या इराद्याने उतरणार आहे.पुण्यातील पहिल्या सामन्यात भारताला दारुण पराभव पत्करावा लागला होता. पण रांचीत परतफेड करीत ६९ धावांनी सामना जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत आणण्यात यश आले. पुण्याच्या गवताळ खेळपट्टीने भारतीय फलंदाजांचे अवसान गळाले. रांचीतील मंद खेळपट्टीवर मात्र भारतीय खेळाडूंना उत्तम ताळमेळ साधण्यात यश आले होते.गोलंदाजही नियंत्रणात होते. लंकेच्या फलंदाजांना त्यांनी फटकेबाजीची संधीच दिली नाही. फलंदाजी आणि गोलंदाजीतील प्रयोग करताना धोनीचे नेतृत्वदेखील प्रभावी जाणवले. शिखर धवन, रोहित शर्मा, हार्दिक पंड्या या सर्वांनी चांगली फलंदाजी केली. अजिंक्य रहाणेला मात्र थोडा संघर्ष करावा लागला. रविवारी रहाणेऐवजी मनीष पांडेला संधी मिळण्याची शक्यता आहे.गोलंदाजीत आश्विनकडून सुरुवात करवून घेतल्यानंतर मधल्या षटकात सर्वच फिरकी गोलंदाजांचा प्रभावी वापर करून घेतला. वेगवान जसप्रीत बुमराह याला तब्बल १६ व्या षटकात चेंडू सोपविण्यात आला होता. आशिष नेहरा आणि बुमराह यांनी टिच्चून मारा केला. दुसरीकडे लंकेचे गोलंदाज फारसे प्रभावी जाणवले नाहीत. तिसारा परेराने हॅट्ट्रिक नोंदविली खरी; मात्र तीदेखील वेळ निघून गेल्यानंतरच. फलंदाजीत तिलकरत्ने दिलशान हाच एकमेव अनुभवी चेहरा आहे. (वृत्तसंस्था)युवीला फलंदाजीत बढती देणे अवघड : धोनी रांची : आघाडीच्या चार फलंदाजांचा सध्या फॉर्म बघता विश्वचषकासाठी टी-२० संघात पुनरागमन करणाऱ्या युवराजसिंग याला फलंदाजीत बढती देणे अवघड असल्याची कबुली कर्णधार धोनीने दिली. युवराजला दुसऱ्या सामन्यात सातव्या स्थानावर पाठविण्यात आले होते. यावर धोनी म्हणाला, ‘‘तसे पाहता युवी आमचा पाचव्या स्थानावरील फलंदाज आहे; पण आघाडीचे चारही फलंदाज चांगली कामगिरी करीत असल्याने त्याला वरचा क्रम देणे कठीण होते. ’’हॅट्ट्रिकबाबत कल्पना नव्हती : परेरारांची : डेथ ओव्हरमध्ये धावा रोखण्यासाठी टिच्चून मारा करण्यावर लक्ष केंद्रित केल्याने हॅट्ट्रिक झाल्याची मला कल्पना नव्हती, असे लंकेचा २६ वर्षांचा वेगवान गोलंदाज तिसारा परेरा म्हणाला. टी-२०मध्ये हॅट्ट्रिक साधणारा तो लंकेचा पहिला गोलंदाज आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ही त्याची दुसरी हॅट्ट्रिक होती. परेराने अखेरच्या षटकात चौथ्या चेंडूवर हार्दिक पंड्या, पाचव्या चेंडूवर रैना आणि अखेरच्या चेंडूवर युवराजला बाद केले. वन-डेत त्याने पाकविरुद्ध हॅट्ट्रिक केली आहे. पराभवाबद्दल परेराने, ‘‘माझा संघ कामगिरीत अपयशी ठरला,’’ अशी प्रतिक्रया दिली.बळजबरीने संघाबाहेर हाकलणार आहात का?धोनीचा प्रतिहल्ला :निवृत्तीच्या प्रश्नावर मीडियावर घेतले तोंडसुखटी-२० आणि वन डे संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने निवृत्तीची शक्यता फेटाळून लावली आहे. यासंबंधी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात माहीने, ‘तुम्ही मला बळजबरीने संघाबाहेर घालविण्यास इच्छुक आहात का,’ असा उलट सवाल मीडियाला केला.दुसऱ्या टी-२० लढतीत श्रीलंकेला ६९ धावांनी नमविल्यानंतर पत्रकार परिषदेत हा अखेरचा टी-२० सामना आहे असे समजायचे का, असा प्रश्न करताच धोनी संतापला. तो म्हणाला. ‘तुम्ही बळजबरीने मला संघाबाहेर करणार आहात का? या प्रकारात मी चांगला खेळत असताना काही जण मला संघाबाहेर करण्यास इच्छुक दिसतात.’लंकेवर दुसऱ्या विजयाबाबत तो म्हणाला, ‘हा सांघिक विजय होता. घरच्या मैदानावर चांगला खेळ करण्याचे दडपण असते. मी येथे आतापर्यंत चांगलाच खेळ केला आहे. खेळपट्टीही चांगली होती. थिसारा परेराला १९ व्या षटकात हॅट्ट्रिक मिळाली नसती तर आम्ही २०० वर मजल गाठली असती. हेलिकॉफ्टर शॉट खेळण्यासाठी संधी आणि तसा चेंडू हवा असतो का, असे विचारताच हसऱ्या मुद्रेत धोनी म्हणाला, ‘हेलिकॉफ्टर समुद्रावर उडविता येत नाही आणि तेथे उतरविताही येत नाही. त्यासाठी योग्य स्थान हवे. माझ्या शॉटचेही तसेच आहे.’भारत : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, युवराजसिंग, रवींद्र जडेजा, रविचंद्रन आश्विन, जसप्रीत बुमराह, पवन नेगी, आशिष नेहरा, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार आणि हरभजनसिंग.श्रीलंका : दिनेश चंडीमल (कर्णधार), दुष्मंता चामिरा, निरोशन डिकवेला, तिलकरत्ने दिलशान, बिनुरा फर्नांडो, दिलहारा फर्नांडो, असेला गुणरत्ने, धनुष्का गुणतिलका, चमारा कापूगेदारा, तिसारा परेरा, सेकुगे प्रसन्ना, कासुन रजीता, सचित्र सेनानायके, दासुन सनाका, मिलिंदा सिरिवर्धना, जाफरी वेंडरसे.स्थळ : विशाखापट्टणमसामन्याची वेळ : सायंकाळी ७.३० पासून
मालिका विजयाचे ‘लक्ष्य’
By admin | Published: February 13, 2016 11:39 PM