- बसवराज मठपती, पुणे
गेल्या तीन सामन्यांत पराभव स्वीकारावा लागलेल्या रायझिंग पुणे सुपरजायंट्सला पराभवाचे शुक्लकाष्ठ तोडण्यासाठी गंभीरपणे प्रयत्न करावे लागतील; मात्र पुण्याचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या समोर कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीर याचे तगडे आव्हान असेल. यात धोनी किती यशस्वी होतो, हे पाहणे उत्सुकतेचे आहे. निलंबित चेन्नई सुपर किंग्ज संघाचा यशस्वी कर्णधार असलेला धोनी या मोसमात पुणे संघाकडून फारशी प्रभावी कामगिरी दाखवू शकलेला नाही. गत विजेते मुंबई चॅम्पियन्स विरुद्ध विजयी सलामी दिल्यानंतरच्या तिनही सामन्यांत त्याला पराभव स्वीकारावा लागलेला आहे. अशा स्थितीत संघाचा गाडा विजयरथावर आणणे तितके सोपे असणार नाही. कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानेदेखील पुण्यावर थाटात विजय मिळविला. पुणे संघाकडे केविन पीटरसन, स्टीव्ह स्मिथ, फाफ डू प्लेसिस व अजिंक्य रहाणे यांसारखे तगडे फलंदाज असूनही संघाला प्रभावी कामगिरी करता आलेली नाही. थिसारा परेरा व रजत भाटिया बहरात आहेत. मात्र, इशांत शर्मा, आर. आश्विन व मुरूगन आश्विन यांना मात्र या सामन्यात अचूक मारा करावा लागेल. दुसरीकडे गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील मध्यफळीतील मनीष पांडे, अष्टपैलू शकिब-अल्-हसन, सूर्यकुमार यादव, आंद्रे रसेल व युसूफ पठाण यांसारखे फलंदाज आहेत. शकिब मध्यफळीत धावा करण्यास यशस्वी ठरत आहे. मोर्ने मॉर्केल याच्याकडे जलदगती गोलंदाजीची धुरा असेल. त्याच्या साथीला उमेश यादव असेल. तर फिरकीची धुरा शकिब, पीयूष चावला, सुनील नारायण, रसेल व युसूफ असतील. दुसरीकडे पुण्याच्या धोनीची बॅट तळपलेली नाही. चार सामन्यांत त्याच्या खात्यावर ३२च्या सरासरीने ६४ धावा आहेत. बँगलोर विरोधात त्याने ४१ धावांची खेळी केली. स्मिथ, पीटरसन, प्लेसिसदेखील प्रभावी कामगिरी करण्यात अपयशी ठरले आहेत. अजिंक्य रहाणे याने मात्र त्याच्या खेळीने चांगलेच प्रभावित केले आहे. गेल्या चार सामन्यांत त्याने १५६ धावा फटकावल्या आहेत. थिसारा परेरा व रजत भाटिया यांनीदेखील अचूक मारा करीत फलंदाजांना जखडून ठेवण्याची कामगिरी केली आहे. या सामन्यात खेळाडू कशी कामगिरी करतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे. प्रतिस्पर्धी संघकोलकाता नाइट रायडर्स गौतम गंभीर (कर्णधार), सुनील नारायण, रॉबिन उथप्पा, पीयूष चावला, युसूफ पठाण, शकीब-अल्-हसन, मॉर्ने मॉर्केल, उमेश यादव, मनीष पांडे, जयदेव उनाडकट, जॉन हेस्टिंग्ज, ख्रिस लिन, सूर्यकुमार यादव, आंद्रे रसेल, ब्रॅड हॉग, कुलदीप यादव, कॉलिन मन्रो, शेल्डन जॅक्सन, जेसन होल्डर, मनन शर्मा, राजगोपाल सतीश व सूर्यकुमार यादव.रायझिंग पुणे सुपरजायंट्स महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रविचंद्रन आश्विन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल मार्श, फाफ डू प्लेसीस, ईशांत शर्मा, केविन पीटरसन, इरफान पठाण, रुद्र प्रतापसिंग, रजत भाटिया, अंकित शर्मा, बाबा अपराजित, मुरुगन आश्विन, स्कॉट बोलँड, अंकुश ब्यास, अशोक डिंडा, जसकरम सिंग, ईश्वर पांडे, थिसारा परेरा, पीटर हँडस्कॉब व अॅडम झम्पा.