नवी दिल्ली : आगामी १४ डिसेंबरला होत असलेल्या अध्यक्ष आणि महासचिवपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या पात्रतेबाबत चर्चा करण्यासाठी भारतीय आॅलिम्पिक संघटनेने (आयओए) २९ नोव्हेंबरला विशेष साधारण बैठक (एसजीएम) बोलावली आहे. नवीन अधिका-यांच्या निवडीकरिता ‘आयओए’ने प्रक्रिया निश्चित केली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी २९ नोव्हेंबरपर्यंतची अंतिम मुदत दिली आहे.विशेष म्हणजे यासह एक चर्चा पुन्हा रंगू लागली आहे, की आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे (एफआयएच) अध्यक्ष नरिंदर बत्रा अध्यक्षपदासाठी लढू शकतात. विद्यमान अध्यक्ष एन. रामचंद्रन यांनी याआधीच स्वत:चे नाव अध्यक्षपदाच्या शर्यतीतून मागे घेतले आहे. त्याचवेळी, विद्यमान ‘आयओए’ खजिनदार आणि अखिल भारतीय टेनिस संघटनेचे माजी अध्यक्ष अनिल खन्नादेखील अध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच, याशिवाय ३ उमेदवार खजिनदारपदासाठी अर्ज दाखल करू शकतात. ‘आयओए’चे महासचिव राजीव मेहता यांनी सांगितले, ‘९ नोव्हेंबरला चेन्नईत झालेल्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत निर्णयाबाबत व ८ नोव्हेंबरला आयओएसीच्या पत्रानुसार ‘आयओए’ची विशेष साधारण सभा बोलाविण्यात आली आहे.’
‘आयओए’ची २९ नोव्हेंबरला एसजीएम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 3:44 AM