पुणे : बहुतांश कुस्तीप्रेमींचे अंदाज चुकवत शेैलेश शेळके आणि हर्षवर्धन सदगीर या मल्लांनी सोमवारी ६३व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या किताबी लढतीसाठी आपली दावेदारी सिद्ध केली आहे. माती विभागातून लातूरचा शैलेश शेळके व गादी विभागातून नाशिक जिल्ह्याचा हर्षवर्धन सदगीर यांनी सुवर्ण जिंकले. आता या दोघांमध्ये मंगळवारी महाराष्ट्र केसरीच्या विजेतेपदाचा निर्णय होईल. दोघांनीही पहिल्याच प्रयत्नात किताबी गटाच्या निर्णायक लढतीसाठी मुसंडी मारली, हे विशेष!म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरु असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्र केसरी खुला गट माती विभागातील अंतिम फेरी अटीतटीची झाली. शैलेश व सोलापूरचा ज्ञानेश्वर जमदाडे यांच्यापैकी विजेता कोण ठरेल, याबाबत निर्धारित वेळेच्या शेवटच्या ४ सेकंदांतही सांगणे अशक्य होते. अखेरच्या क्षणी शैलेशने ११-१० अशी बाजी मारत महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीसाठी आपले स्थान निश्चित केले. यानंतर शैलेशने आनंदाच्या भरात प्रशिक्षक काका पवार यांना खांद्यावर घेत आखाड्याला फेरी मारली.नाशिक जिल्ह्याच्या हर्षवर्धन सदगीरने २०१७चा ‘महाराष्ट्र केसरी’ पुणे शहराचा अभिजित काटकेला ५-२ असे पराजित केले. ही सोमवारच्या दिवसातील लक्षवेधी लढत ठरली. विजेतेपदाच्या प्रमुख दावेदारांपैकी एक असलेल्या अभिजितच्या तोडीस तोड चपळ लढत देत अखेर हर्षवर्धन किताबी लढतीसाठी पात्र ठरला.उपांत्य फेरीतील थरारमाती विभागातील उपांत्य फेरीत ज्ञानेश्वर उर्फ माऊली जमदाडे व गतवर्षीच्या महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख यांच्यात चुरशीची लढत झाली. अपेक्षेप्रमाणे बाला रफिकने लीड घेतली. पण तोडीस तोड टक्कर देत माऊलीने एका मिनिटात त्याला चितपट करून बाजी मारली व अंतिम सामना निश्चित केला. शैलेशने हिंगोलीच्या गणेश जगतापवर ६-४ असा विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. पुणे शहराचा अभिजित कटके व लातूरचा सागर बिराजदार यांच्यात गादी विभागासाठी चित्त थरारक लढत झाली. यात अभिजितने सागरवर २-० गुणांनी विजय मिळवत गादी विभागातील अंतिम फेरीत प्रवेश केला, तर हर्षवर्धन सदगीरने मुंबई उपनगरच्या सचिन येलवारला ६-० ने नमवत अंतिम फेरीत प्रवेश केला.>गदा ‘काकां’च्याच तालमीत येणार!‘महाराष्ट्र केसरी’ ची मानाची गदा शैलेश जिंको वा हर्षवर्धन, ती गदा अर्जुन पुरस्कार विजेते माजी मल्ल आणि प्रशिक्षक काका पवार यांच्याच तालमीत येणार आहेत. कारण किताबी लढतीसाठी पात्र ठरलेले हे दोन्ही मल्ल काकांचेच पठ्ठे आहेत. आपल्या दोन्ही शिष्यांनी किताबी लढतीसाठी मुसंडी मारल्याचा आनंद काकांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. दिवसाच्या लढती संपल्यानंतर काका पवार म्हणाले, ‘दोन्ही मल्ल ग्रीको रोमन प्रकारात कुस्ती खेळून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले आहेत. मात्र ‘महाराष्ट्र केसरी’ किताबासाठी दोघेही प्रथमच खेळत आहेत. दोघेही मॅटवर सराव करतात.मात्र, माती वा गादी या कोणत्याही विभागात खेळले तरी ते किताबी लढतीसाठी समोरासमोर येणार, याचा विश्वास असल्याने दोघांनाही वेगवेगळ्या विभागातून खेळवले. या दोघांनीही माझा विश्वास सार्थ ठरवला. प्रशिक्षक म्हणून मला दोघांचाही सार्थ अभिमान आहे. कुणीही जिंको, मी कृतार्थ असेल.’
शैलेश शेळके-हर्षवर्धन सदगीर यांच्यात रंगणार किताबी लढत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2020 4:20 AM