वेलिंग्टन : शाकिब अल हसन तसेच कर्णधार मुशफिकर रहीम यांनी पाचव्या गड्यासाठी केलेल्या विक्रमी भागीदारीच्या बळावर बांगला देशने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीत दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात ७ बाद ५४२ असा डोंगर उभारला. शाकिबने २१७ धावा ठोकल्या. बांगलादेशकडून कुठल्याही खेळाडूने ठोकलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. दिवसाचा खेळ संपायला १५ मिनिटे असताना बाद झालेल्या अष्टपैलू शाकिबने २७६ चेंडू टोलवीत ३१ चौकार मारले. मुशफिकरने १५९ धावा फटकाविल्या. बांगलादेशने सकाळी ३ बाद १५४ वरून पुढे खेळ सुरू केला. मोमीनूल हक (६४) हा चौथ्याच षटकांत बाद झाला. त्यानंतर पुढील ८३ षटके शाकिब आणि मुशफिकर यांनी न्यूझीलंडला त्रास दिला. शाकिबचा काल चार धावांवर सेंटेनरने झेल सोडला होता. त्यानंतर आज १८९ धावांवर रॉस टेलरने त्याला दुसऱ्यांदा जीवदान दिले. याशिवाय मुशफिकर ७८ धावांवर असताना बोल्टचा चेंडू बॅटला लागून यष्टीला स्पर्श करून गेला, पण बेल्स न पडल्याने तो बचावला. (वृत्तसंस्था)वॅगनर न्यूझीलंडचा यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने १२४ धावांत तीन तर बोल्ट आणि टिम साऊदी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. खेळ थांबला तेव्हा शब्बीर रहमान १० धावांवर नाबाद होता. (वृत्तसंस्था)
शाकिब, रहिमची विक्रमी भागीदारी
By admin | Published: January 14, 2017 1:24 AM