ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ९ - रिओ ऑलिम्पिकमध्ये ताकदीच्या बळावर नव्हे तर टेक्निकच्या बळावर पदक जिंकू शकले, असे मत कांस्य विजेती महिला मल्ल साक्षी मलिक हिने शुक्रवारी व्यक्त केले. साक्षीचा एअर इंडियाच्यावतीने सत्कार करण्यात आला. तिला मोफत बिझनेस क्लास प्रवासाची ऑफर देण्यात आली आहे.
हरियाणाची २४ वर्षांची साक्षी सत्काराला उत्तर देताना म्हणाली,‘ कोच म्हणतात, माझी ताकद हेच माझे हत्यार आहे पण माझ्यामते मी टेक्निकच्या बळावर विजय मिळविण्यात यशस्वी होऊ शकले. कुस्ती ताकदीचा खेळ आहेच. भारतीय मल्ल साधारणत: ताकदीच्या बळावर जिंकतात देखील. अन्य देशंचे मल्ल सुरुवातीच्या तीन मिनिटांपर्यंतआक्रमक असतात उलट भारतीय मल्ल सहा मिनिटे आक्रमकपणा जोपासतात.’
रिओतील कांस्य पदकाच्या त्या क्षणांना उजाळा देत साक्षी पुढे म्हणाली,‘ती लढत तणावपूर्ण होती. आम्ही १५ दिवसांपासून रिओत दाखल झालो होतो. पदक मिळणार का, या चिंतेत वेळ जायचा. पदकाची ताकद आणि महत्त्व ओळखण्यास मला वेळ लागला. दिल्ली विमानतळावर पोहोचल्यानंतर मी किती चांगले काम केले आहे हे मला कळले.