बेंगळुरू : गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर प्रदीर्घ कालावधीपासून संघाबाहेर असलेला भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आपल्या सहकाऱ्यांसह सरावास प्रारंभ केला. विश्वकप स्पर्धेदरम्यान गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्रस्त असलेला शमीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तो अद्याप पूर्णपणे फिट नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या तीन वन-डे सामन्यांसाठी त्याची संघात निवड करण्यात आलेली नाही. दुखापतीतून सावरत असल्याचे शमीने सांगितले. गुरुवारी सरावानंतर बोलताना शमी म्हणाला,‘मी आता पूर्ण रनअपने गोलंदाजी करीत आहे. मला कुठला त्रास जाणवत नाही. मी ४५ मिनिटे गोलंदाजीचा सराव केला असून मी माझ्या फिटनेसबाबत समाधानी आहे.’संघव्यवस्थापनाचे शमीच्या फिटनेसवर लक्ष आहे. त्याचा फिटनेस बघता अखेरच्या दोन वन-डेसाठी त्याचा संघात समावेश करण्याबाबत विचार होऊ शकतो. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी संघात निवड झालेले खेळाडू राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सराव करीत आहेत. संघात समावेश नसताना शमी व्यतिरिक्त रवींद्र जडेजा, ईशांत शर्मा, वरुण अॅरोन आणि करुण नायर यांच्यासारखे खेळाडूही सरावात सहभागी झाले आहेत. (वृत्तसंस्था)
शमीने केली सरावाला सुरुवात
By admin | Published: September 26, 2015 12:07 AM