ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. १० - शशांक मनोहर यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. ऑक्टोंबर २०१५ मध्ये जगमोहन दालमिया यांचे निधन झाल्यानंतर त्यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून त्यांचा हा दुसरा कार्यकाळ होता.
शशांक मनोहर यांना आयसीसीचे अध्यक्षपद भूषवायचे असल्याने त्यांनी राजीनामा दिल्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियमानुसार आयसीसी अध्यक्ष स्वतंत्र असला पाहिजे. आयसीसीच्या अध्यक्षपदावर असताना देशाच्या क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपद भूषवात येत नाही. त्यामुळे मनोहर यांनी राजीनामा दिल्याची शक्यता आहे.
शशांक मनोहर यांचा मुदतीपूर्वीच राजीनामा देण्याचा निर्णय बीसीसीआयमध्ये अनेकांना पटलेला नाही. शशांक मनोहर यांची क्रिकेटमध्ये पारदर्शकता आणण्याची क्षमता असल्याने त्यांना या पदावर नियुक्त केले होते. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे बीसीसीआयमध्ये बरीच उलथापालथ झाली.
सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या लोढा समितीने स्वच्छ पारदर्शक कारभारासाठी अनेक शिफारसी केल्या आहेत. राजीनामा देण्यापूर्वी शशांक मनोहर यांनी अन्य बीसीसीआय सदस्यांशी चर्चा केली होती. मनोहर यांच्यानंतर आता या पदासाठी शरद पवार यांचे नाव चर्चेत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुंबई क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष आहेत. मनोहर शरद पवार यांच्या निकटवर्तीय वर्तुळातील आहेत. बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर, अजय शिर्के आणि राजीव शुक्ला यांची नावेही अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.
He resigned because candidate for ICC President post must be independent member: Anurag Thakur on Shashank Manohar pic.twitter.com/pUyK1Lc3Sn— ANI (@ANI_news) May 10, 2016