लंडन : माजी विजेती रशियाची मारिया शारापोवा, अव्वल मानांकित अमेरिकेची सेरेना विलियम्स, पोलंडची एग्निएज्का रंदावास्का व स्पेनच्या गार्बाइन मुगुरूजा यांनी महिला एकेरीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून उपांत्य फेरीतील आपली जागा निश्चित केली. दुसरीकडे पुरुष एकेरीत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा टेनिसपटू स्वीत्झर्लंडचा रॉजर फेडरर, सर्बियाचा नोवाक जोकोविच यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली आहे.फेडररने २० व्या मानांकित स्पेनच्या रॉबर्टाे बालिस्ता याचा ६-२, ६-२ आणि ६-३ ने पराभव केला. फ्रेंच ओपन विजेत्या वावरिंका याने बेल्जियमच्या डेव्हिड गोफिन याचा सलग सेटमध्ये ७-६, ७-६, ६-४ ने पराभव केला. दुसरीकडे, टॉपवर असलेल्या सर्बियाच्या नोवाक जोकोविचने केविन अॅँडरसनला पाच सेटपर्यंत चाललेल्या सामन्यात पराभूत केले.नोवाक जोकोविच आणि केविन अॅँडरसन यांच्यातील सामना अंधुक प्रकाशामुळे रोखण्यात आला होता. त्या वेळी जोकोविचने पहिले दोन सेट गमावल्यानंतर पुढील दोन्ही सेट जिंकत शानदार पुनरागमन केले होते. पहिले दोन सेट त्याने ६-७, ६-७ ने गमावले होते. त्यानंतर ६-१, ६-४ अशी कामगिरी करीत त्याने सामन्यात रंगत आणली. अखेरचा तसेच निर्णायक सेट जोकोविचने ७-५ ने जिंकला. हा सामना पावणेचार तास रंगला. विजयासाठी जोकोविचला अखेरच्या सेटमध्ये ४५ मिनिटे संघर्ष करावा लागला. महिलांच्या एकेरीत स्पेनची २० वी मानांकित गार्बाइनने टिमियाला ७-५, ६-३ असे सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले. दुसऱ्या महिलांच्या एकेरीत अव्वल मानांकित अमेरिकेच्या सेरेना विलियमसने बेलारुसच्या विक्टोरिया अजारेंकाचा सुमारे २ तास चाललेल्या लढतीत ३-६, ६-२,६-३ असा पराभव केला. महिलांच्या दुसऱ्या लढतीत पोलंडच्या एग्निएज्का रंदावास्काने अमेरिकेच्या मेडिसन कीजला १ तास ५५ मिनिटांत ७-६ (७-३), ३-६, ६-३ असे पराभूत केले. उपांत्य फेरीत रंदावास्काची लढत मुगुरुजाशी होईल. (वृत्तसंस्था)पेस-हिंगीस जोडी उपांत्यपूर्व फेरीतभारताचा लिएंडर पेस व स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस या जोडीने न्यूझीलंडचा आर्तेम सिताक व आॅस्ट्रेलियाची एनस्तेसिया रोडियानोव्हा जोडीला सरळ दोन सेटमध्ये सहज पराभूत करून मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पेस-मार्टिनाने आर्तेम-एनस्तेसिया यांना ४८ मिनिटांत ६-२, ६-२ असे नमविले. पेस-मार्टिनाने आपल्या प्रतिस्पर्ध्यांची दोन्ही सेटमध्ये दोन-दोन वेळा सर्व्हिस तोडली; मात्र त्यांना एक वेळ ब्रेक पॉइंटचा सामना करता आला नाही. पेस-मार्टिनाने ५६, तर आर्तेम - एनस्तेसिया यांनी ३४ अंक जिंकले. कारकिर्दीतील हा सर्वात कठीण सामना असल्याचे त्याने कबूल केले. तो म्हणाला, मी दोन सेटने पिछाडीवर होतो. त्यानंतर कोर्टवर पुनरागमन करीत दोन्ही सेट जिंकले. त्यामुळे मी संतुष्ट झालो आणि पुढील आव्हानासाठी आत्मविश्वासही उंचावला. आजचे काही क्षण निराशाजनक राहिले; पण पुढे जाण्यासाठी पूर्ण आशावादी आहे.
शारापोवा, सेरेना उपांत्य फेरीत
By admin | Published: July 08, 2015 1:18 AM