मॉस्को : डोपिंगमध्ये दोषी आढळल्यानंतर बंदीला सामोरी गेलेली माजी अव्वल टेनिसपटू आणि ५ ग्रँडस्लॅमविजेती रशियाची मारिया शारापोवा सध्या अभ्यास आणि पुस्तक लिहिण्यामध्ये वेळ व्यतीत करीत आहे. तसेच, ती बॉक्सिंगही शिकत आहे. एका चॅट शोमध्ये शारापोवाने आपण फिटनेस कार्यक्रमांतर्गत बॉक्सिंग शिकत असल्याचे सांगितले. डोपिंगमध्ये दोषी आढळल्यानंतर शारोपावर दोन वर्षांची बंदी लादण्यात आली होती. परंतु, नंतर तिच्या शिक्षेमध्ये घट करुन ही बंदी १५ महिन्यांनी कमी करण्यात आली. यानुसार, आगामी २६ एप्रिलला शारापोवा पुन्हा एकदा टेनिस कोर्टवर उतरेल. विशेष म्हणजे, आपल्या ३०व्या वाढदिवसानंतर ७ दिवसांनी शारापोवा पुनरागमन करणार आहे.शारापोवाने सांगितले, ‘‘मी स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करीत असून त्यासाठी बॉक्सिंग शिकत आहे. हा प्रयोग खूप शानदार ठरला. कारण यामुळे मला दु:खी केलेल्या लोकांचा मी विचार करून बॉक्सिंग करायची.’’ गतवर्षी २०१६मध्ये आॅस्टे्रलियन ओपन दरम्यान झालेल्या डोपिंग परीक्षणामध्ये प्रतिबंधित औषध घेतल्याने शारापोवा पकडली गेली होती. यानंतर आपला व्यवसाय वाढविण्यासाठी शारापोवाने हॉर्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये अभ्यासाला सुरुवात केली. तसेच, तिने आपल्या आयुष्यावर पुस्तक लिहिण्यासही सुरुवात केली. याबाबत शारापोवा म्हणाली, ‘‘मी एक पुस्तक लिहिले असून ते सप्टेंबरपर्यंत प्रकाशित होईल. सुरुवातीला हे पुस्तक इंग्रजी भाषेत असेल. त्यानंतर त्याचा रशियन भाषेत अनुवाद होईल.’’ (वृत्तसंस्था)
तंदुरुस्तीसाठी शारापोवा शिकतेय बॉक्सिंग
By admin | Published: February 03, 2017 4:59 AM