आकाश नेवे / आॅनलाईन लोकमत आयपीएलमध्ये प्ले आॅफसाठी धडपडणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाबने आज प्ले आॅफच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले. त्यांचा प्ले आॅफमधील प्रवेश शक्यतांवर अवलंबून असला तरी आजच्या सामन्यात पंजाबने सांघिक कामगिरीच्या जोरावर केकेआरला पराभूत केले. ख्रिस लिनच्या दमदार फटकेबाजीनंतरही पंजाबच्या मोहित शर्मा आणि राहूल तेवातिया यांच्या भेदक माऱ्यासमोर केकेआरला लीन व्हावे लागले. कोलकाता नाईट रायडर्स संघाचा प्ले आॅफमधील प्रवेश निश्चीत मानला जात आहे. मात्र पंजाबदेखील प्लेआॅफसाठी जोरदार प्रयत्न करत आहे. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना आमलाच्या अनुपस्थितीतही पंजाबच्या फलंदाजांनी सांघिक कामगिरी दाखवली. स्पर्धेत फारसा दम न दाखवता आलेल्या वृद्धीमान साहा याने मोक्याच्या वेळी उपयुक्त अशा ३८ धावा फटकावल्या. अष्टपैलु आणि कर्णधार ग्लेन मॅक्सवेलने फटकेबाजी करत संघाला १६७ चा आकडा गाठून दिला. कुल्टर नाईलला वगळण्याचा निर्णय केकेआरला महागात पडला. त्या ऐवजी संधी मइळालेल्या अविनाश राजपूत याला फारशी छाप पाडता आली नाही. तर डी ग्रॅण्ड होम हा केकेआरला चांगलाच महागात पडला. त्याने ३७ धावा मोजल्या. पंजाबने वरुण अॅरोन आणि टी नटराजन ऐवजी राहूल तेवातिया आणि स्वप्नील सिंग यांनी संधी दिली. हाच निर्णय पंजाबसाठी फायद्याचा ठरला. राहूल तेवातिया आणि मोहित शर्माच्या कामगिरीनेच पंजाबला विजय मिळवून दिला. सुनिल नरेन आणि ख्रिस लीन यांनी अपेक्षेप्रमाणे संघाला सुरूवात करून दिली. लिनने जास्तच आक्रमकता दाखवत फटकेबाजी केली. नरेनला सुरूवातीपासून लय सापडत नव्हती. तो चाचपडत होता. अखेर त्याला मोहितने बाद केले. त्यानंतर आलेल्या गंभीरला आणि लगेचच उथप्पाला राहूल तेवातियाने बाद करत केकेआरला मोठा धक्का दिला. त्यातून अखेरपर्यंत केकेआर सावरू शकला नाही. लिन एका बाजुने धावा करत असताना मनिष पांडे मात्र संथ पणे खेळत होता. त्याला मॅट हेन्रीने बाद केले. त्यानंतर केकेआरच्या आशा युसुफ पठाणवर होत्या. विजयासाठी १२ च्या धावगतीने धावा काढणे गरजेचे होते. मात्र फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या पठाणलाही हे आव्हान पेलवले नाही. मोहित शर्माने गरजेच्या वेळी त्याला बाद करत पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पंजाबने या सामन्यात विजय मिळवलेला असला तरी या पुढच्या सामन्यात त्यांच्यासमोर मुंबई आणि पुण्याचे आव्हान असेल. प्ले आॅफच्या शर्यतीसाठी पंजाबला दोन्ही सामने जिंकावे लागतील.
शर्मा, तेवातियासमोर केकेआर लीनच
By admin | Published: May 10, 2017 2:08 AM