चेन्नई : येथे सुरु असलेल्या चेन्नई ओपन टेनिस स्पर्धेत द्विवीज शरण आणि पुरव राजा या जोडीने भारतीयांच्या विजेतेपदाच्या आशा जिवंत ठेवताना गुईरर्मो दुरान आणि आंद्रेस मोलतेनी या अर्जेटिनाच्या द्वितीय मानांकित जोडीवर सनसनाटी विजय मिळवून दुहेरीच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले.शरण आणि राजा या बिगर मानांकित जोडीने सेमीफायनलमध्ये आपले संपूर्ण वर्चस्व राखत ६३ मिनिटात ६-४, ६-२ असा विजय मिळवला. भारतीय जोडीने या सामन्यात दोन ब्रेक पॉर्इंटसुध्दा वाचवले. आॅस्ट्रेलियन ओपनच्या मुख्य ड्रॉमध्ये खेळणाऱ्या राजा-शरण जोडीने पहिल्या फेरीत आपल्या सर्व्हिसवर फक्त तीन अंक गमावले. मात्र दुसऱ्या फेरीत राजाने दोनदा सर्व्हिस गमावली. शरणने आपल्या सर्व्हिसवर संपूर्ण सामन्यात फक्त पाच गुण गमावले.शरण आणि राजा या जोडीची ही तिसरी एटीपी स्तरावरील फायनल असेल. यापूर्वी या जोडीने बोगोटा (२0१३), लोस कोबोस (२0१६) येथे विजेतेपद मिळवले आहे.या फेरीत एकेरीतील भारतीय आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले आहे. दुहेरीत लियांडर पेस बाहेर पडल्यानंतर शरण-राजा जोडीवर भारतीयांच्या आशा होत्या. या दोघांनी चाहत्यांना निराश केले नाही. रोहन बोपन्ना आणि जीवन नेदुनचेझियान ही जोडी जर उद्या सेमीफायनल जिंकल्यास दुहेरीत भारताचे विजेतेपद निश्चित होईल. रोहन-जीवन यांना अंतिम फेरी गाठण्यासाठी अमेरिकेचा निकोलस मोनरो आणि न्यूझीलंडचा आर्तेम सिताक या चतुर्थ मानांकित जोडीचे आव्हान मोडून काढावे लागेल. (वृत्तसंस्था)>मेदवेदेव पहिल्यांदाच फायनलमध्येरशियाच्या डॅनियल मेदवेदेव याने चेन्नई ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्लोव्हाकियाच्या जोजेफ कोवालिक याला सरळ सेटमध्ये हरवून पहिल्यांदा एटीपी वर्ल्ड टूर स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. मेदवेदेवने एकतर्फी सामन्यात कोवालिकला १ तास २८ मिनिटांच्या लढतीत ६-४, ६-१ असे हरवले. मेदवेदेव याला आता इस्त्रालयच्या डुडी सेला याच्याशी लढणार आहे.>कोवालिक आज पराभूत झाला असला तरी तो या स्पर्धेत भाव खावून गेला. पात्रता फेरी खेळून त्याने मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश मिळवला. मुख्य फेरीतही त्याने जागतिक मानांकनात सहाव्या स्थानावरील मारिन सिलिच याला हरवून आपण नशिबाने मुख्य फेरी गाठली नसल्याचे दाखवून दिले.
शरण-राजा जोडी अंतिम फेरीत
By admin | Published: January 07, 2017 4:33 AM