ऑनलाइन लोकमत
ग्रेटर नोएडा, दि. 10 - बीसीसीआय कायदेशीर संकटांचा सामना करीत असताना अध्यक्ष या नात्याने शशांक मनोहरांनी हिमतीने सामना करायला हवा होता. बुडत्या जहाजाला ‘कॅप्टन’ची गरज होती त्यावेळी ते निघून गेले.’ भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे चेअरमन अॅड. शशांक मनोहर यांच्यावर टीका करीत शनिवारी त्यांच्या भूमिकेबद्दल शंका व्यक्त केली.
बीसीसीआयने आयसीसीला द्विस्तरीय कसोटी प्रणालीचा प्रस्ताव मागे घेण्यास भाग पाडले. २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बजेटवरही आक्षेप नोंदविला. या विरोधानंतर मनोहर यांनी बीसीसीआयचे हित जोपासणे माझ्यासाठी अनिवार्य नाही, अशी भूमिका घेतली तर ठाकूर यांनी जाहीरपणे मनोहरांवर टीकेचे शस्त्र उगारले आहे.
आयसीसीच्या मार्गात बीसीसीआय मोठा अडथळा...
मनोहर यांच्या शंकास्पद भूमिकेला लक्ष्य करीत ठाकूर म्हणाले,‘आयसीसी चेअरमनच्या वक्तव्यामुळे काही फरक पडणार नाही. तथापि बोर्डातील माझे सदस्य काय विचार करतात हे अध्यक्ष या नात्याने सांगणे माझे कर्तव्य आहे. बोर्डाला अध्यक्ष या नात्याने मनोहर यांची गरज होती तेव्हा ते बुडत्या जहाजाला सोडून जाणाºया कॅप्टनप्रमाणे आम्हाला सोडून चालले गेले. सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढाईसाठी आम्ही त्यांच्याकडे आशेने पाहात होतो.’ बीसीसीआयच्या खांद्यावर बंदूक ठेवून मनोहर हे क्रिकेट विश्वातील सुरक्षित स्थान शोधत होते, असा आरोप ठाकूर यांनी केला. आयसीसीतील १०५ सदस्यांपैकी कमकुवत सदस्यांसोबत उभे राहणे बीसीसीआयचे कर्तव्य आहे, हे मनोहर यांना समजले नसावे, असा टोला देखील त्यांनी मारला. झिम्बाब्वे, श्रीलंका, बांगला देश या देशांच्या पाठीशी उभे राहण्याची आज सर्वाधिक गरज आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तीनपट अधिक खर्च का होत आहे हे विचारण्याची गरज आहे. टीव्ही अधिकारातून मिळणाºया पैशात काही देश भागीदारी मागत आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांना प्रसारण हक्क विकण्यात अडचणी येत आहेत. त्यासाठी बीसीसीआयला कसे जबाबदर धरू शकता, असा सवाल ठाकूर यांनी उपस्थित केला.
आम्हाला एकाकी पाडण्याचा डाव...
फुटबॉल यासाठी लोकप्रिय झाला कारण या खेळाचे नियम लवकर लवकर बदलले जात नाहीत. आम्ही बदल स्वीकारण्यास तयार आहोत. गुलाबी चेंडूने दुलिप करंडक सामने खेळवित आहोत. पण आम्हाला घाई नाही. रणजी ट्रॉफीतील प्रयोगानंतर अहवालावर विस्तृत विचार केला जाईल, असे ते म्हणाले. मनोहर यांनी आयसीसी चेअरमनपदाचा भार स्वीकारल्यापासून नवे पदाधिकारी बीसीसीआयला अलिप्त करण्याच्या प्रयत्नांत असल्याचे नमूद करीत ठाकूर पुढे म्हणाले,‘ श्रीलंका आणि नेपाळ बोर्डात त्यांच्या सरकारने हस्तक्षेप केला त्यावेळी आयसीसीने चिंता व्यक्त केली पण लोढा समितीच्या शिफारशीमुळे बीसीसीआयच्या कारभारात हस्तक्षेपाचा प्रयत्न होतो आहे तेव्हा आयसीसी गप्प का? देशात आणि आयसीसीमध्ये बीसीसीआयला मोकळ्या मनाने काम करण्याचे स्वातंत्र्य नाही, असे वाटते.’