ऑनलाइन लोकमत
दुबई, दि. 15 - आयसीसीचे चेअरमन शशांक मनोहर यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. आठ महिन्यांपूर्वीच मनोहर यांनी आयसीसीच्या चेअरमनचा कार्यभार स्वीकारला होता. मे 2016 रोजी मनोहर यांची आयसीसीच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली होती. दरम्यान, मनोहर यांनी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. मनोहर यांनी आपले राजीनामा पत्र आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांना पाठवला आहे. त्यात ते म्हणतात, ''गेल्या वर्षी माझी आयसीसीच्या चेअरमनपदी एकमताने निवड झाली होती. मी आयसीसीचा पहिला स्वतंत्र चेअरमन बनलो. समितीच्या प्रत्येक निर्णयात आपले सर्वश्रेष्ठ योगदान देण्याचा आणि निष्पक्षपातीपणे काम करण्याचा मी प्रयत्न केला. मात्र आता वैयक्तिक कारणांमुळे या पदावर राहणे मला शक्य होणार नाही. त्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे.'' कर्तव्यकठोर प्रशासक अशी ओळख असलेल्या मनोहर यांनी दोन वेळा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्षपद भूषवले होते. 25 सप्टेंबर 2008 ते 19 सप्टेंबर 2011 दरम्यान मनोहर यांनी पहिल्यांदा बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवले होते. त्यानंतर 2015 साली जगमोहन दालमिया यांचे निधन झाल्यानंतर पुन्हा एकदा शशांक मनोहर यांच्याकडे बीसीसीआयचे अध्यक्षपद सोपवण्यात आले होते.
मात्र आयसीसीच्या चेअरमनपद भूषणवण्याची संधी मिळाल्यावर मनोहर यांनी 10 मे 2016 रोजी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान, 12 मे 2016 रोजी त्यांची आयसीसीच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली होती.
Shashank Manohar steps down from the post of ICC chairperson due to personal reasons. pic.twitter.com/g8oauOVjBH— ANI (@ANI_news) March 15, 2017