दुबई : आयसीसीच्या संचालकांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाचा मान राखतो,अशी सबब देत शशांक मनोहर यांनी ‘यू-टर्न’ घेत आयसीसी अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा सध्या मागे घेतला आहे. २०१७ च्या आमसभेनंतर नव्या अध्यक्षांचा शोध घेईस्तोवर मी पदावर राहणार असल्याचे मनोहर यांनी म्हटले आहे. मनोहर यांनी १५ मार्च रोजी वैयिक्तक कारण पुढे करीत आयसीसी अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले होते. आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेत असून यापुढेही आयसीसीचे अध्यक्षपद भूषवणार असल्याचा निर्णय शशांक मनोहर यांनी घेतल्याचे आयसीसीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. शशांक मनोहर यांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी आयसीसीकडून गेल्या काही दिवसांपासून मनोहर यांची मनधरणी सुरू होती. आयसीसीचे प्रशासन आणि आर्थिक पुनर्रचनेतील बदल जोवर पूर्णत्वास येत नाहीत, तोवर आपण अध्यक्षपदावर कायम राहावे, अशी विनंती आयसीसीने मनोहर यांना केली. परिषदेच्या विनंतीला मान देऊन अखेर मनोहर यांनी आपला राजीनामा मागे घेत असल्याचे सांगितले असल्याचे आयसीसीने म्हटले आहे.बीसीसीआयचा विरोध डावलून आयसीसीच्या महसूल आराखड्यात बदल करण्यात आल्यामुळे मनोहर यांनी राजीनामा देण्याचे पाऊल उचलल्याचे म्हटले गेले.मनोहर यांची मे २०१६ साली आयसीसीच्या अध्यक्षपदावर बिनविरोध निवड झाली होती. दोन वर्षांसाठी आयसीसीच्या अध्यक्षपदाची धुरा मनोहर यांच्याकडे सोपविण्यात आली होती. पण आपला वर्षभराचा कार्यकाल शिल्लक असताना असा तडकाफडकी राजीनामा दिल्याने मनोहर यांनी सर्वांना धक्काच दिला होता. (वृत्तसंस्था)
शशांक मनोहरांचा ‘यू-टर्न’
By admin | Published: March 24, 2017 11:47 PM