नवी दिल्ली : भारतीय संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी टीकाकारांचे लक्ष्य ठरलेल्या विराट कोहलीची पाठराखण केली आहे. विश्वकप स्पर्धेत विराटची कामगिरी आणि त्याची महिलामित्र अनुष्का शर्मा याचा काही संबंध नसल्याचे शास्त्री यांनी स्पष्ट केले. शास्त्री म्हणाले, ‘‘असे जर असते तर विराटने आॅस्ट्रेलियात कसोटी मालिकेत ७०० धावा फटकावल्या नसत्या आणि चार शतकेही झळकावली नसती. अन्य खेळाडूंप्रमाणे विराटही शिस्तीचा भोक्ता आहे. त्याच्या हृदयाची स्पंदने केवळ भारतासाठीच आहेत. तो आक्रमक खेळाडू आहे.’’गेल्या वर्षी इंग्लंड दौऱ्यात निराशाजनक कामगिरीनंतर आॅस्ट्रेलिया दौऱ्यात सूर गवसलेल्या विराटची शास्त्री यांनी प्रशंसा केली. शास्त्री यांनी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचीही प्रशंसा केला. त्याच्या फलंदाजीमध्ये आणखी सुधारणा होईल, असेही ते म्हणाले.शास्त्री यांनी सांगितले, ‘‘धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली असून त्याला आता कामगिरी सुधारण्यावर लक्ष केंद्रित करता येईल. तो आता पूर्वीच्या तुलनेत अधिक फिट होईल आणि फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याच्याकडे पुरेसा वेळ असेल.’’ भारताच्या मार्गात स्टीव्हन स्मिथ नेहमी अडसर ठरला. शास्त्रीने या युवा आॅस्ट्रेलियन फलंदाजाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. शास्त्री म्हणाले, ‘‘अनेक संघांनी मला स्मिथच्या कमकुवत बाजूबाबत विचारणा केली. माझे उत्तर होते, की जर तुम्हाला काही त्रुटी आढळली तर मला नक्की सांगा.’’शास्त्री म्हणाले, ‘‘स्मिथचे ‘हॅन्ड-आय कॉर्डिनेशन’ शानदार असून त्याला क्रिकेटची चांगली समज आहे.’’भारताचे वेगवान गोलंदाज उमेश यादव, मोहम्मद शमी आणि मोहित शर्मा यांची प्रशंसा करताना शास्त्री म्हणाले, ‘‘मी शमीला कोलकाताचा नवाब, उमेशला विदर्भाचा नवाब आणि मोहितला राजधानीपेक्षा वेगवान हरियाना एक्स्प्रेस म्हणतो. त्यांनी खरंच वेगवान गोलंदाजांप्रमाणे गोलंदाजी केली. भारतीय गोलंदाजांनी या स्पर्धेत शानदार कामगिरी केली. हाशीम आमला व युनूस खान यांना आपण किती वेळा आखूड टप्प्याच्या चेंडूवर बाद होताना बघितले आहे. गोलंदाजीमध्ये विविधता आश्विनची ताकद आहे. युवा भारतीय संघात प्रतिभा असून, यापैकी ८० टक्के खेळाडू २०१९ च्या विश्वकप स्पर्धेत संघात स्थान मिळविण्याचे दावेदार आहेत.’’ (वृत्तसंस्था)
शास्त्री यांनी केली विराटची पाठराखण
By admin | Published: March 31, 2015 11:49 PM