मुलाखतीचा वाद : दोन माजी कर्णधारांमधील शाब्दिक युद्धाला नवे वळण
ऑनलाइन लोकमतकोलकाता, दि. २९ : कोच पदावरून भारताच्या दोन माजी कर्णधारांमध्ये सुरू असलेले शाब्दिक युद्ध नव्या वळणावर पोहोचले. रवी शास्त्री यांच्या टीकेला उत्तर देत रागावलेल्या सौरभ गांगुली याने भारतीय कोचचे पद न मिळाल्याने शास्त्री हे मला जबाबदार ठरवीत असून, ते हवेत उड्या मारत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.अनिल कुंबळे मुख्य कोच बनल्यानंतर शास्त्री यांनी एक वादग्रस्त वक्तव्य करीत वादाला तोंड फोडले होते. मी मुलाखत देत असताना तीन सदस्यीय पॅनलमधील सौरभ गांंगुली याने अनुपस्थिती दर्शवीत माझा अपमान केल्याची भावना शास्त्रीने व्यक्त केली होती. याप्रकरणी कुणीही माघार घ्यायला तयार नाही.
रागावलेल्या गांगुलीने शास्त्रीवर शाब्दिक वार केला. त्याने रवी शास्त्री यांच्या मुलाखतीच्या वेळी बँकॉकमध्ये सुट्या घालविण्याच्या पद्धतीवर ताशेरे ओढले. तो म्हणाला,माझ्या मते, शास्त्रीची टीका फारच वैयक्तिक आहे. रवीला वाटते की, कोच न बनण्यामागे गांगुलीची भूमिका आहे तर तो हवेत उड्या मारत आहे, असे समजायला हवे. कोच बनण्याची त्याला कळकळ असती तर बँकॉकमध्ये सुट्या घालवायला जाणे आवश्यक होते का? पुढच्या वेळी कोचच्या मुलाखतीसाठी येईल तेव्हा गांगुलीने उपस्थित राहायला हवे, असा शास्त्री मला सल्ला देतो. मला राग येणे स्वाभाविक आहे.
बैठकीत सहभागी होण्याची त्याची सूचना स्वागतार्ह आहे. पण ही सूचना आधी स्वत:ला लागू करायला हवी. मी बीसीसीआयच्या बैठकीत नेहमीच सहभागी होत आलो. भारतीय संघाच्या कोचपदासाठी त्याचे नाव पुढे आले तेव्हा शास्त्रीने वेळ काढायला हवा होता. बँकॉकमधून सुट्यांचा आनंद लुटताना रवी मुलाखत देतो यातच त्याच्या व्यक्तिमत्त्वातील गंभीरपणा सिद्ध होतो.ह्ण(वृत्तसंस्था)