ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - भारतीय क्रिकेट संघाच्या संघव्यवस्थापनात सध्या सुरू असलेल्या मोठ्या उलथापालथीला आज नवीन वळण मिळाले आहे. अनिल कुंबळेने काही दिवसांपूर्वी संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर वर्तवण्यात येत असलेल्या शक्यतेप्रमाणे आता रवी शास्त्री भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज करणार आहे. विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच्यात उत्तम ताळमेळ असल्याने विराटने रवी शास्त्री भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी असावा, असे मत व्यक्त केले होते.
रवी शास्त्रीने याआधी 2014 ते 2016 या काळात भारतीय क्रिकेट संघाचा संघसंचालक म्हणून काम पाहिले होते. तसेच 2007 साली त्याने काही काळासाठी त्याची भारतीय संघाचा संघव्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. विराट कोहली आणि त्याचे चांगले संबंध असल्याने तसेच संघासोबत याआधी काम केलेले असल्याने प्रशिक्षकपदासाठीच्या इतर प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत शास्त्रीचे पारडे जड राहण्याची शक्यता आहे. एका वृत्तपत्राशी बोलताना शास्त्रीने आपण भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करणार असल्याचा चर्चेला दुजोरा दिला आहे. शास्त्रीच्या आधी वीरेंद्र सेहवाग, लालचंद राजपूत, डोडा गणेश, टॉम मुडी आणि रिचर्ड पायबस यांनी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत झालेल्या वादानंतर अनिल कुंबळे याने प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला होता. जेमतेम वर्षभर संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची सूत्रे सांभाळणाऱ्या कुंबळेच्या मार्गदर्शनाखाली संघाने चांगली कामगिरी केली होती. मात्र कर्णधार विराट कोहली आणि कडक शिस्तीचा कुंबळे यांच्यात खटके उडू लागले. पुढे मतभेद तीव्र झाल्याने दोघांमध्ये बऱ्याच काळापासून अबोला होता. चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान त्यांच्यातील वाद विकोपाला गेला होता.