मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे निर्देशक रवि शास्त्री यांचा करार संपला असून सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सौरभ गांगुली यांच्या क्रिकेट सल्लागार समितीला योग्य वाटले तर या कराराचे नूतनीकरण होवू शकते, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव अनुराग ठाकुर यांनी दिली.बीसीसीआयने रवि शास्त्री यांच्यासोबत ट्वेंटी-२0 विश्वचषकापर्यंतच करार केला होता. संघाचे स्पर्धेतील आव्हान संपल्यामुळे आता हा करार संपुष्टात आला आहे. याबाबत बोलताना ठाकुर म्हणाले, शास्त्रीसोबतचा निर्देशक म्हणून करार संपला आहे. आता संघाला पूर्णकालिन प्रशिक्षक देण्याची गरज आहे. संघासाठी प्रशिक्षक किंवा संघ निर्देशक यापैकी एकच पद असेल, दोन्ही पदे एकाच वेळी नसतील, परंतु याचा संपूर्ण निर्णय क्रिकेट सल्लागार समिती घेईल. रवि शास्त्री यांना मुदतवाढ मिळणार का? या प्रश्नावर ठाकुर म्हणाले, हा पूर्णपणे सल्लागार समितीचा निर्णय असेल, आम्ही मात्र पूर्णकालिन प्रशिक्षक असावा या मताचे आहोत, समितीला त्यासाठी संभाव्य उमेदवारांची यादी तयार करण्यास सांगितले आहे. इंग्लंड दौऱ्यापासून शास्त्री संघासोबत जुळले आहेत.
शास्त्रींचा करार संपला; समिती निवडणार नवा कोच
By admin | Published: April 02, 2016 1:22 AM