- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांची मागणी मान्य करताना बीसीसीआयने मंगळवारी भरत अरुण यांची भारतीय क्रिकेट संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती जाहीर केली. त्यामुळे या पदाबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला.शास्त्री संघाचे संचालक होते त्या वेळी अरुण गोलंदाजी प्रशिक्षक होते. त्यांनी लवकरच सुरू होत असलेल्या दुसऱ्या कार्यकाळासाठी अरुण यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्याचा आग्रह धरला होता. अरुण यांना दोन वर्षांसाठी करारबद्ध करण्याचा निर्णय शास्त्री यांच्या प्रशासकांची समिती (सीओए) तसेच काळजीवाहू अध्यक्ष सी. के. खन्ना आणि सचिव अमिताभ चौधरी यांच्यासह बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांसोबतच्या मुलाखतीनंतर घेण्यात आला. चौधरी म्हणाले, ‘पॅट्रिक फरहार्ट फिजिओपदी कायम राहतील. सर्व नियुक्त्या दोन वर्षांसाठी असून २०१९ च्या विश्वकप स्पर्धेपर्यंत पदावर कायम असतील.’ या निर्णयामुळे बीसीसीआयने पूर्णपणे यू टर्न घेतल्याचे निदर्शनास येते. बीसीसीआयने सुरुवातीला झहीर खानला गोलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्त केले होते आणि त्यानंतर स्पष्टीकरण देताना ही नियुक्ती केवळ विदेश दौऱ्यासाठी असल्याचे म्हटले होते. राहुल द्रविड यांच्या फलंदाजी सल्लागारपदाबाबतही स्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. झहीर व द्रविड यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाबाबत बोलताना शास्त्री म्हणाले, ‘हे सर्व काही त्यांच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे. व्यक्ती विशेष संघाला किती वेळ देण्यास इच्छुक आहे, यावर सर्व काही अवलंबून आहे. त्यांचे मार्गदर्शन अमूल्य असून संघात त्यांचे स्वागत आहे.’ मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली त्या वेळी शास्त्री लंडनमध्ये होते. त्यांनी या महत्त्वाच्या पदासाठी त्यांची निवड करण्यात आल्यामुळे क्रिकेट सल्लागार समितीचे (सीएसी) आभार व्यक्त केले. या समितीमध्ये सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली व व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश आहे. मी सीएसीचे आभार व्यक्त करण्यास इच्छुक आहे. कारण भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपद सन्मानाची बाब आहे. त्यांनी मला या पदासाठी लायक समजल्यामुळे मी त्यांचा आभारी आहे. माझी सपोर्ट स्टाफबाबतची भूमिका स्पष्ट होती. याबाबत तुम्हाला कल्पना आहे. याव्यतिरिक्त बीसीसीआयने वन-डे विश्वकप २०१९ पर्यंत संजय बांगर यांना सहायक प्रशिक्षक व आर. श्रीधर यांना क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. - रवी शास्त्री