मीरपूर : आयसीसी टी-२० विश्वकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर फलंदाजांना मोठे फटके खेळण्याचा सराव करण्यासाठी शेर-ए-बांगला स्टेडियमची खेळपट्टी ‘आदर्श नाही’ असे भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीने म्हटले आहे. पाकिस्तानविरुद्ध विजय मिळविल्यानंतर प्रतिक्रिया देताना भारतीय कर्णधार म्हणाला, ‘येथे टी-२० विश्वकप स्पर्धेसाठी चांगला सराव होईल, असा आम्ही विचार केला होता. येथे फटके खेळणे कठीण आहे. खेळपट्टी गोलंदाजांना अनुकूल असून येथे मोठे फटके खेळणे कठीण आहे. टी-२० लढतीत चाहते ८० किंवा १०० असा स्कोअर बघण्यासाठी येत नाही. टी-२० मध्ये त्यांना षटकार व चौकार बघताना आनंद मिळतो. कमी धावसंख्येच्या लढतीत किमान स्कोअर १३०-१३५ असायला पाहिजे तर मोठ्या धावसंख्येच्या लढतींमध्ये २०० ते २४० दरम्यान धावसंख्या असू शकते.’ विराट कोहली दडपणाच्या स्थितीत अतिरिक्त जबाबदारी स्वीकारत असल्यामुळे धोनीने आनंद व्यक्त केला; पण अडचणीच्या स्थितीत हा भारताचा आतापर्यंतचा सर्वोत्तम फलंदाज आहे का, याबाबत मात्र वक्तव्य करण्याचे त्याने टाळले. धोनी म्हणाला, ‘आम्ही नेहमी तुलना का करतो. अन्य खेळाडूंनीही चांगली कामगिरी केलेली असून खेळाडूंमध्ये तुलना करणे योग्य नाही. मी पाच वर्षांपेक्षा अधिक काळ कर्णधारपदू भूषवले आहे; पण प्रत्येक खेळाडूवर किती दडपण असते, हे मला सांगता येणार नाही.’ धोनीने युवराजच्या संघर्षपूर्ण खेळीची प्रशंसा केली. त्याने किती धावा फटकावल्या यापेक्षा त्याने किती चेंडू खेळले याला अधिक महत्त्व आहे, असेही धोनी म्हणाला.(वृत्तसंस्था)‘इयरपीस’च्या वापरावर नाराजी १‘इयरपीस’सारख्या पंचगिरी उपकरणाच्या वापराबाबत धोनीने नाराजी व्यक्त केली. कारण या तंत्राच्या वापरामुळे पंचांना गर्दी असलेल्या स्टेडियममध्ये बॅट व चेंडू यांचा संपर्क झाल्याचा छोटा आवाज ऐकता येणार नाही. २बांगलादेशचे पंच एसआयएस साइकत यांना भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान आशिया कप टी-२० स्पर्धेतील लढतीदरम्यान आशिष नेहराच्या चेंडूवर खुर्रम मंजूरच्या बॅटला चाटून गेलेल्या चेंडूंचा आवाज ऐकता आला नाही. त्यामुळे धोनीने नाराजी व्यक्त केली. ३‘जर पंच वॉकी-टॉकीचा वापर करतात तर त्यासोबत कानाला इयरपिस लावला असेल तर ते केवळ एका कानाने पंचगिरी करीत असतात. यावर विचार करण्याची गरज आहे. गोलंदाजी करताना इयरपीस लावण्याची काही गरज नाही. कारण त्या वेळी त्याची काही गरज नसते. दोन्ही कानांचा वापर करणे आवश्यक आहे.’
शेरे बांगला स्टेडियमची खेळपट्टी टी-२० साठी आदर्श नाही : धोनी
By admin | Published: February 29, 2016 2:43 AM