चेन्नई : ब्रिस्बेन कसोटीच्या चौथ्या दिवशी सकाळी शिखर धवनच्या फलंदाजीस न जाण्याचा निर्णयाबद्दल बीसीसीआय संघ व्यवस्थापनाकडे स्पष्टीकरण मागविणार आहे. भारतीय संघ ज्या पद्धतीने कसोटीत फ्रंटफूटवरून बॅकफुटवर गेला त्याबद्दल मंडळाने प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. ड्रेसिंग रुममधील मतभेदाचीही बीसीसीआय चौकशी करणार असल्याचे पदाधिकाऱ्याने एका दैनिकाशी बोलताना स्पष्ट केले. सकाळी खेळ सुरू झाल्यानंतर शिखर धवनला एका तासातच फलंदाजीला यावे लागले. हेच तो सकाळी का करू शकला नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त करून सांगून सूत्रांनी सांगितले की, यामुळे चांगली सुरुवात भारताला मिळाली असती. पहिला तास खेळपट्टीवर टिकून राहण्याची आवश्यकता होती, त्यामुळे कदाचित कसोटी जिंकता आली असती. पण, शिखरच्या निर्णयामुळे सगळेच गणित बिघडले त्यामुळे त्याच्या जखमेची तीव्रता कळणे गरजेचे आहे. भारतीय संघाने खराब खेळपट्टी आणि सुविधांबद्दल तक्रार केली आहे, पण अशा गोष्टी होतच असतात. त्याला महत्त्व देण्याची गरज नाही. ईशांत शर्मा आणि सुरेश रैना यांना स्टेडियममध्ये शाकाहारी भोजन मिळाले नसल्याचा प्रकार मात्र गंभीर आहे. हा प्रकार खरा असेल तर आम्ही आॅस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाकडे याबाबत चर्चा करू.