नवी दिल्ली/इंदूर : सर्वोच्च न्यायालयाने अनुराग ठाकूर आणि अजय शिर्के यांची बीसीसीआयच्या अध्यक्ष तसेच सचिव पदावरून हकालपट्टी केल्यानंतर लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्याचे फर्मान सोडताच संलग्न राज्य संघटनांमधील पदाधिकाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे.याचाच एक भाग म्हणून मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेच्या (एमपीसीए) व्यवस्थापनात मोठे फेरबदल घडून आले. एपीसीए चेअरमन ज्योतिरादित्य शिंदे तसेच अध्यक्ष संजय जगदळे यांच्यासह महत्त्वाच्या चार पदाधिकाऱ्यांनी खुर्च्या रिकाम्या केल्या. सौराष्ट्र क्रिकेट संघटनेतील वजनदार चेहरा आणि बीसीसीआयचे माजी सचिव निरंजन शाह हे देखील पदावरून दूर झाले आहेत.एमपीसीएचे सीईओ रोहित पंडित यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोढा समितीच्या शिफारशींचे पालन करण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदे, जगदळे आणि संघटनेतील दोन उपाध्यक्ष एम. के. भार्गव तसेच अशोक जगदळे हे पदमुक्त झाले.लोढा समितीच्या शिफारशीनुसार कुठलीही व्यक्ती बीसीसीआय आणि राज्य संघटनेत नऊ वर्षांपेक्षा अधिक काळ पदावर राहू शकणार नाही. शिंदे आणि जगदळे हे एमपीसीएत नऊ वर्षांहून अधिक काळ वेगवेगळ्या पदांवर राहिले. त्यामुळे त्यांनी तात्काळ पद सोडले.उपाध्यक्ष भार्गव आणि अशोक जगदळे यांचे वय ७० वर्षांहून अधिक असल्याने ते देखील पदावर राहण्यास पात्र नाहीत. एमपीसीए व्यवस्थापनावर दीर्घकाळापासून शिंदे गटाचे वर्चस्व आहे.२००१ मध्ये एमपीसीएचे तत्कालीन अध्यक्ष माधवराव शिंदे यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे संघटनेत आले. काही वर्षे ते एमपीसीएचे अध्यक्ष होते. ज्येष्ठ क्रिकेट प्रशासक संजय जगदळे अनेक वर्षांपासून विविध पदावर कार्यरत राहिले. चार पदे एकाच क्षणी रिक्त झाल्याने पुढे काय, असे विचारताच संजय जगदळे यांनी यावर भाष्य करण्यास नकार दिला. हे कायदेशीर प्रकरण असल्याने वैयक्तिक मताला अर्थ नसतो, इतकेच त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
शिंदे, जगदळे, शाह पदच्युत
By admin | Published: January 05, 2017 2:22 AM