मुंबई : सन 2019-20,2020-21 व 2021-22 असे तीन वर्षांचे एकूण ११७ पुरस्कार आज जाहीर केले गेले. शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार सन २०१९-२० श्रीकांत वाड(ठाणे),सन २०२०-२१ दिलीप वेंगसरकर आणि सन २०२१-२२ आदिल सुमारीवाला (मुंबई) यांना जाहीर करण्यात आला आहे. 1983 वनडे विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य असलेल्या वेंगसरकर यांनी BCCIच्या राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्षपदही भूषवले आहे.
तिन्ही वर्षांतील पुरस्कारांमध्ये शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कारासाठी दोन, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारासाठी (खेळाडू) 13, जिजामाता पुरस्कारासाठी (क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार) एक, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी (खेळाडू) 81 , साहसी पुरस्कारासाठी 5 तसेच शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी (दिव्यांग खेळाडू) 14 अशा एकूण 116 मान्यवरांची निवड झाली आहे.
2019-20 वर्षासाठीच्या विजेत्यांमध्ये मुंबई उपनगरचा बॉक्सर सौरभ लेणेकर, कबड्डीपटू सायली जाधव, ठाण्याची पॉवरलिफ्टर नाजुका घारे, मुंबई उपनगरची सिद्धी मणेरीकर (स्पोर्ट्स क्लायंबिंग) आणि मेधाली रेडकर (डायव्हिंग/वॉटरपोलो) यांचा समावेश असून बॅडमिंटनपटू तन्वी लाड, मुंबई उपनगरचा मल्लखांबपटू दीपक शिंदे यांना थेट पुरस्कार देण्यात आला आहे. 2020-21 वर्षासाठी मुंबई शहरची नेमबाज याशिका शिंदे, ठाण्याचा कबड्डीपटू नीलेश साळुंके, मुंबई उपनगरचा खो-खोपटू अक्षय भांगरे, ठाण्याची प्रियंका भोपी, मुंबई शहरची पॉवरलिफ्टिर श्रेया बोर्डवेकर तसेच 2021-22 वर्षासाठी ठाण्याचा पॉवरलिफ्टर साहील उतेकर, मुंबई शहरची रग्बी खेळाडू भरत चव्हाण, मुंबई शहरची जलतरणपटू ज्योती पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
थेट पुरस्कारांतर्गत कबड्डी प्रकारात कबड्डी प्रशिक्षक प्रशांत चव्हाण (ठाणे) आणि प्रताप शेट्टी (ठाणे) तसेच कुस्तीमध्ये अमरसिंह निंबाळकर (पुणे) यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.
उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शकासाठीच्या (2019-20) पुरस्कार विजेत्यांमध्ये डॉ. श्यामसुंदर जोशी (जिम्नॅस्टिक, औरंगाबाद), शिरीन गोडबोले (खो-खो, पुणे) आणि दिव्यांग खेळांचे क्रीडा मार्गदर्शन संजय भोसकर (नागपूर) यांचा समावेश आहे. त्या वर्षीसाठी दर्शना पंडित यांना (सॉफ्टबॉल, औरंगाबाद) जिजामाता पुरस्कार जाहीर झाला आहे. 2020-21 वर्षासाठी संजोग ढोले (जिम्नॅस्टिक्स, पुणे), राहुल राणे (स्केटिेंग, पुणे), डॉ. अभिजीत इंगोले (सॉफ्टबॉल, अमरावती) तसेच दिव्यांग खेळांचे मार्गदर्शन विनय साबळे (औरंगाबाद) यांचा समावेश आहे. 2021-22 वर्षासाठी क्रीडा मार्गदर्शक/जिजामाता पुरस्कारासाठी सिद्धार्थ कदम (जिम्नॅस्टिक्स, औरंगाबाद), चंद्रकांत इलग (धनुर्विद्या, बुलढाणा) आणि किशोर चौधरी (सॉफ्टबॉल, जळगाव) यांची निवड झाली आहे.
राज्य क्रीडा पुरस्कार विजेत्या दिव्यांग खेळाडूंमध्ये 2019-20 वर्षासाठी योगेश्वर घाटबांधे आणि भाग्यश्री माझिरे (अॅथलेटिक्स), मीन थापा (व्हीलचेअर बास्केटबॉल), आरती पाटील (बॅडमिंटन), 2020-21 वर्षासाठी दीपक पाटील आणि वैष्णवी जगताप (जलतरण) तसेच सुरेश कुमार (व्हीलचेअर बास्केटबॉल) आणि श्रीकांत गायकवाड (पॅरा-आर्चरी), 2021-22 वर्षासाठी प्रणव देसाई आणि आकुताई उलभगत(अॅथलेटिक्स) तसेच अनिल काची (बास्केटबॉल) आणि अनुराधा सोळंकी (व्हीलचेअर-तलवारबाजी) यांंचा समावेश आहे. 2019-20 वर्षासाठी मृणाली पांडे (बुद्धिबळ) तसेच 2021-22 वर्षासाठी भाग्यश्री जाधव (अॅथलेटिक्स) यांना थेट पुरस्कार जाहीर झाला आहे.साहसी खेळांसाठी 2019-20 वर्षासाठी सागर कांबळे (जल), कौस्तुभ राडकर (जमीन), 2020-21 वर्षांसाठी कृष्ण प्रकाश (जल) आणि केवल कक्का (थेट पुरस्कार) तसेच 2021-22 वर्षासाठी जितेंद्र गवारे (जमीन) यांना पुरस्कार मिळाला आहे.