टोकियो : जागतिक स्पर्धेतील माजी कांस्य विजेता शिव थापा (६३ किलो) याने कडव्या झुंजीनंतर विजयासह बुधवारी आॅलिम्पिक चाचणी बॉक्सिंग स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली. दुसरीकडे, पूजा राणीने (७५ किलो) आणि आशिष (६९) यांनीही आपापल्या गटातून अंतिम फेरी गाठली. अन्य भारतीय खेळाडूंना मात्र सुरुवातीच्या फेरीत पराभवानंतर कांस्यवर समाधान मानावे लागले.
सकाळच्या सत्रात उपांत्य फेरीत चार वेळेचा आशियाई पदक विजेता तसेच या महिन्याच्या प्रारंभी तिसऱ्यांदा राष्टÑीय विजेता ठरलेल्या शिव थापा याने जपानचा दायसुके नारीमात्सु याच्यावर मात केली. शिव आणि पूजा यांनी कडव्या संघर्षानंतर विजय मिळविला. दोघांची कामगिरी शानदार ठरली. आशिषने जपानचा हिरोकी किज्यो याच्यावर विजय नोंदवून अंतिम फेरीत धडक दिली. आशियाई क्रीडा स्पर्धेची माजी कांस्य विजेती पूजा राणी हिने ब्राझीलची बिट्रिज सोरेस हिच्यावर सर्वसंमतीच्या निर्णयाआधारे मात केली. पूजाने आशियाई चॅम्पियनशिपचे रौप्य जिंकले होते. सिमरनजीत कौर (६०) व सुमित सांगवान (९१) यांना कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
झरीन, पुइया यांची घोडदौड खंडीतमाजी विश्व ज्युनियर विजेती निकत झरीन ५१ किलो गटात तसेच पुरुष गटात वाहलीम पुइया (७५) उपांत्य लढतीत पराभूत होताच दोघांना कांस्यवर समाधान मानावे लागले. झरीन जपानची सना कावानोविरुद्ध, तर वाहलीम पुइया स्थानिक प्रबळ दावेदार युइतो मोरीवाकीविरुद्ध पराभूत झाले.