मुंबईः येथे सुरु असलेल्या ओम भारत क्रीडा मंडळ आयोजित आमदार – नगरसेवक चषक कबड्डी स्पर्धेत शिव मराठा स्पोर्ट्स क्लब (सांताक्रूझ) आणि शूर संभाजी मंडळ (कुर्ला) या दोन बलाढ्य संघांमध्ये कुमार गटाची अंतिम झुंज रंगणार आहे. शूर संभाजीने उपांत्य फेरीच्या रोमहर्षक लढतीत सांताक्रूझच्या सुभाष उत्कर्ष संघाला ३०-२१ असे नमवले. सामन्याच्या पहिल्या सत्रात शूर संभाजीने सन्नी यादवच्या पल्लेदार चढाया आणि नवीन पैडीकलवा याच्या अप्रतिम पकडी यामुळे सुभाष उत्कर्षवर झटपट लोन देत १०-४ अशी आघाडी घेतली. मात्र त्यानंतर इलान वास्कर याच्या झंझावाती चढाया आणि ईशराईत वास्करच्या पकडी या बंधूंच्या आक्रमक खेळाने त्यांनी लोणची परतफेड केली. मध्यंतराला शूर संभाजी संघाकडे १३-१२ अशी नाममात्र एका गुणाची आघाडी होती, शेवटच्या चार मिनिटापर्यंत उभय संघात चांगलाच संघर्ष पहावयास मिळाला. मात्र अखेर शूर संभाजी संघाने ३०-२१ अशी बाजी मारली.
महिला गटात गोरेगावच्या संघर्ष क्रीडा मंडळाने नवख्या गोरखनाथ संघावर २९-१४ असा आरामात विजय मिळविला असला तरी गोरखनाथ संघाची छोट्या चणीची काव्या बाठे हिचा चढाई-पकडीचा बेडर खेळ तसेच मानसी चिकणे हिच्या चढाया यांना प्रेक्षकांनी मनमुराद दाद दिली. संघर्षच्या यशात अश्विनी कांबळे हिच्या चढाया, अश्विनी घाणेकरच्या पकडी यांचा मोलाचा वाटा होता. आता उपांत्य फेरीत संघर्ष विरुद्ध बलाढ्य महात्मा गांधी आणि चेंबूर क्रीडा केंद्र विरुद्ध बोरिवलीचा ओम नवमहाराष्ट्र संघ अशा चुरशीच्या लढती रंगणार आहेत.
प्रथम श्रेणी पुरुष गटातील लढतीत नवमहाराष्ट्र मंडळ (बोरीवली) संघाने स्फूर्ती क्रीडा मंडळावर ३०-१५ असा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. जबरदस्त ताकदीच्या नितेश मोरेच्या आक्रमक चढायामुळे नवमहाराष्ट्र मंडळाने पहिल्या सत्रातच २२-९ अशी मोठी आघाडी घेत सामन्याचा निकाल स्पष्ट केला. नितेशला केतन कुलवंकरने अप्रतिम पकडी करीत छान साथ दिली. स्फूर्ती संघासाठी सुनील यादव आणि संदेश वरलकर यांनी चांगला खेळ केला. आता उपांत्य फेरीत नवमहाराष्ट्र मंडळ विरुद्ध उत्कर्ष आणि साहसी विरुद्ध जॉली अशा लढती होतील.