ताश्कंद : चौथे मानांकन प्राप्त शिव थापा (६० किलो) आणि बिगर मानांकित सुमित सांगवान (९१ किलो) यांनी आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. सुमितने ताजिकिस्तानच्या दुसऱ्या मानांकित जाकोन कुर्बोनोव्हचा पराभव केला. शिव थापाने (६० किलो) आॅलिम्पिक कांस्य विजेत्या मंगोलियाच्या दोर्जनयामबुग ओटगोनडलाईचा पराभव केला. मिडलवेट (७५ किलो) गटात अव्वल मानांकित विकास कृष्ण याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. उपांत्य फेरीत त्याने त्याचा कोरियन प्रतिस्पर्धी चौथा मानांकित ली डोंगयून याला पुढे चाल दिली. आशियाई बॉक्सिंग महासंघाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की,‘विकास कृष्ण शुक्रवारी सकाळी वजन करण्यासाठी आला नाही. त्यामुळे त्याच्या दक्षिण कोरियाच्या प्रतिस्पर्ध्याला पुढे चाल देण्यात आली.’ विकासच्या प्रतिस्पर्ध्याला पुढे चाल का दिली, याचे नेमके कारण मात्र स्पष्ट झाले नाही. शुक्रवारी मात्र शिव थापाने वर्चस्व गाजविले. विश्व चॅम्पियनशिपचा कांस्यपदक विजेता शिव थापा आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता मंगोलियाच्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध रेफ्रींच्या मिश्र निर्णयानंतर आगेकूच करण्यात यशस्वी ठरला.अंतिम फेरीत शिवला उज्बेकिस्तानच्या एलनूर अब्दुरैमोव्हच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. अब्दुरैमोव्हने उपांत्य फेरीत चीनच्या जुन शानचा पराभव केला. दोनदा आॅलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या शिवने सुरुवातीला बचावात्मक पवित्रा स्वीकारत प्रतिस्पर्ध्याची शैली जाणून घेतली. तीन मिनिटांच्या पहिल्या फेरीत उभय खेळाडूंनी आक्रमण करण्याचे टाळले. (वृत्तसंस्था)भारतीय बॉक्सरने दुसऱ्या फेरीत आक्रमक पवित्रा स्वीकारत वर्चस्व गाजवले. तिसऱ्या फेरीमध्ये उभय खेळाडूंदरम्यानची लढत बरोबरीत राहिली. त्यावेळी मंगोलियन बॉक्सरनेही आक्रमकता दाखविली, पण शिव थापाने त्याचे आव्हान परतावून लावले. शेवटी निर्णय शिवच्या बाजूने लागला. आसामच्या या २३ वर्षीय बॉक्सरने २०१३ मध्ये स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते. त्यावेळी तो बँथमवेट गटात खेळत होता. आशियाई चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्णपदक पटकावणारा पहिला भारतीय ठरण्यापासून शिव एक विजय दूर आहे. शिवने २०१५ मध्ये बँथमवेटमध्ये कांस्यपदक पटकावले होते, पण आता तो लाईटवेट गटात खेळतो. तो गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यापासून या वजनगटात खेळत आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत या गटात पहिले पदक राहिले. सुमितने सायंकाळच्या सत्रातील अखेरच्या लढतीत गेल्या वेळी कांस्यपदक जिंकणाऱ्या कुर्बोनोव्हचा सहज पराभव केला. भारताने २०१५ मध्ये आशियाई स्पर्धेत चार पदके पटकावली होती. विकासने त्यावेळी भारतातर्फे एकमेव रौप्यपदक पटकावले होते तर शिव, एल. देवेंद्रो सिंग (५२ किलो) आणि सतीश कुमार (९१ किलो पेक्षा अधिक) यांनी कांस्यपदके पटकावली होती. आशियाई स्पर्धेत भारतातर्फे अखेरचे सुवर्णपदक २०१३ मध्ये शिव थापाने पटकावले होते. त्याआधी, २००९ मध्ये एम. सुरंजय सिंग (५२ किलो) याने सुवर्णपदकाचा मान मिळवला होता.(वृत्तसंस्था)-----------
शिव, सुमित यांचा अंतिम फेरीत प्रवेश
By admin | Published: May 06, 2017 12:48 AM