बँकॉक : शिवा थापाने मंगळवारी येथे आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारताना भारतासाठी आणखी एक पदक निश्चित केले. त्याचसोबत या स्पर्धेत सलग चार पदक पटकाविणारा तो पहिला भारतीय बॉक्सर ठरला. दुसरीकडे, अनुभवी एल. सरिता देवी (६० किलो) जवळजवळ एका दशकात प्रथमच उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरली.विश्व अजिंक्यपदमध्ये कांस्य पटकावणाऱ्या शिवाने लाईटवेट (६० किलो) गटात एकतर्फी लढतीत थायलंडच्या रुजाकर्न जुनत्रोंगचा ५-० ने धुव्वा उडवला. उपांत्य फेरीत त्याच्यापुढे कजाखस्तानच्या जाकीर सफीउल्लिनचे कडवे आव्हान राहील. सफीउल्लिनने २०१५ मध्ये रौप्यपदक जिंकले होते. थापाने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये २०१३ मध्ये सुवर्ण, २०१५ मध्ये कांस्य व २०१७ मध्ये रौप्य पटकावले होते.महिलांच्या ड्रॉमध्ये माजी विश्व विजेत्या सरिताने उपांत्यपूर्व फेरीत संमिश्र निर्णयात कजाखस्तानच्या रिम्मा वोलोस्सेंकोला नमवून पदक निश्चित केले. ३७ वर्षीय सरिताने यापूर्वी २०१० मध्ये सुवर्णपदकाचा मान मिळविला होता. गेल्यावेळची रौप्यपदक विजेत्या मनीषाने फिलिपिन्सच्या पेटेसिओ जजा नीसला नमवून पदक पक्के केले. पुरुष विभागात आशिष कुमारनेही (७५ किलो) उपांत्य फेरी गाठली. त्याने सर्वानुमते झालेल्या निर्णयात किर्गिस्तानच्या ओमेरबेक उलू बेहिजगितचा पराभव केला.
शिवा थापाचे सलग चौथे पदक निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 2:57 AM