ग्लास्गो : भारताच्या सतीश शिवालिंगमने २० व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलन प्रकारात तसेच जितू राय यांनी ५० मीटर पिस्तूल प्रकारात सोमवारी सुवर्णपदके जिंकली. भारोत्तोलनात रवी काटलू तसेच नेमबाजीत गगन नारंग आणि गुरपालसिंग यांनी रौप्य जिंकण्याची कामगिरी केली. २२ वर्षांच्या शिवालिंगमने ७७ किलो वजन गटात नवीन स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदकावर हक्क प्रस्थापित केला. रवी काटलूला रौप्य तसेच आॅस्ट्रेलियाच्या फ्रान्कोइस इटोंडीला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. नेमबाजीत जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेला राय याने पहिल्याच राष्ट्रकुलमध्ये १९४.१ गुणांसह पहिले पदक जिंकले. गुरपालने १८७.२ गुणांसह पहिले रौप्यपदक मिळविले. आॅस्ट्रेलियाचा डॅनिअल रेपाचोली तिसऱ्या स्थानावर राहिला. गगन नारंग याने ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात रौप्याची कमाई केली.भारतीय भारोत्तोलनपटूंनी चौथ्या दिवशीसुद्धा आपली पदके जिंकण्याची मोहीम सुरू ठेवली होती. तमिळनाडू येथील वेल्लूरच्या २२ वर्षी शिवालिंगमने एकाग्रता आणि ताकदीच्या जोरावर एकूण ३२८ किलो वजन उचलून या स्पर्धेत नवीन स्पर्धा विक्रम नोंदवत या स्पर्धेतील भारताचे सहावे सुवर्ण जिंकले. काटलूने ३१७ किलो वजन उचलून रौप्यपदक आपल्या नावावर केले. इटोंडीने ३१४ किलो उचलले. त्याने स्नॅचमध्ये १३७, तर क्लिन अॅन्ड जर्कमध्ये १७७ किलो वजन उचलले. नवी दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेचा सुवर्ण पुरुष नेमबाज गगन नारंग याला मात्र ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात रौप्यावर समाधान मानावे लागले. नारंगने १९३.४ गुणांची नोंद केली. आॅस्ट्रेलियाचा वॉरेन पेटंट याने १९४.० गुणांसह सुवर्ण जिंकले तर इंग्लंडचा केनेथ पार याने १८८ गुणांसह कांस्यपदकाची कमाई केली. नारंगने आपल्या प्रकारात पात्रता फेरीत ६२०.५ गुणांची नोंद करीत तिसरे स्थान घेतले होते. (वृत्तसंस्था)
शिवालिंगम, जितूचे सुवर्ण
By admin | Published: July 29, 2014 6:03 AM