ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 21 - कुंबळे आणि कोहलीच्या वादातील रोज नवनव्या गोष्टी उघड होत आहेत. गेल्या 6 महिन्यांपासून कर्णधार विराट कोहली आणि माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यात कोणत्याही प्रकारचं संभाषण झालं नसल्याची बाब समोर आली आहे. या सर्व गोष्टी समजल्यानंतर बीसीसीआयलाही मोठा धक्का बसला आहे. बीसीसीआय अधिका-यांना टीम इंडियामध्ये काही आलबेल नसल्याची आधीच शंका होती. विशेष म्हणजे सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मणच्या नेतृत्वाखालील मुख्य सल्लागार समितीनंही कुंबळेचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ वाढवण्यासाठी थेट हिरवा कंदील दाखवला नव्हता. या सर्व प्रकरणावर लंडनमधल्या बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिका-यानं प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, रिपोर्ट्समध्ये कुंबळेच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ वाढवण्यासंदर्भात विचार होता. मात्र सगळ्या अडचणी दूर झाल्यावरच कुंबळेला पुन्हा प्रशिक्षकपद दिलं पाहिजे, अशीही एक अट होती. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय संघाच्या हॉटेलमध्ये तीन वेगवेगळ्या बैठका झाल्या. पहिल्या बैठकीत कुंबळेनं बीसीसीआयचे अधिकारी, पदाधिकारी आणि सीएसी सदस्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यानं कर्णधार कोहलीसोबत बैठक केली. मात्र तिसरी बैठक खूप महत्त्वपूर्ण ठरली. या बैठकीत कोहली आणि कुंबळे सोबत होते. तरीही कोहली आणि कुंबळेमध्ये कोणत्याही प्रकारचा संवाद न झाल्यानं बैठक निष्फळ ठरली. कोहली आणि कुंबळेनं गेल्या वर्षी डिसेंबर 2016मध्ये इंग्लंड टेस्ट सीरिज संपल्यानंतर एकमेकांशी बोलणं थांबवलं होतं. दोघांमध्ये वाद होता ते माहीत होतं. मात्र ते 6 महिने एकमेकांशी बोलत नसल्यानं आम्हीसुद्धा अचंबित झालो, असंही बीसीसीआयच्या एका अधिका-यानं सांगितलं आहे. रविवारी भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या अंतिम सामन्यानंतर दोघांमध्ये एक बैठक झाली आणि एकमेकांसोबत काम करण्यास इच्छुक नसल्याचं दोघांनाही समजलं. अनिल कुंबळेला वादामागील कारण विचारण्यात आलं तेव्हा त्यानं विराटची कोणतीही समस्या नाही. पण माझ्या काम करण्याच्या पद्धतीवर कोहलीला आक्षेप असल्याचं कुंबळेनं सांगितलं, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे. तसेच विराटला वाटायचं की, स्वतः क्षेत्रातही अनिल कुंबळे हस्तक्षेप करतोय. कुंबळे स्वतःचा सल्ला नेहमीच कोहलीला देत होता. मात्र कोहलीला त्याचा तो सल्ला स्वतःच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप केल्यासारखा वाटायचा, असंही बीसीसीआयच्या अधिका-यानं सांगितलं आहे.
धक्कादायक! 6 महिन्यांपासून कोहली आणि कुंबळेमध्ये होता अबोला
By admin | Published: June 21, 2017 11:49 PM