नवी दिल्ली : जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे संभाव्य धोका लक्षात घेता येथे होणाऱ्या नेमबाजी विश्वचषकाचे आयोजन स्थगित करण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. याशिवाय टोकियो आॅलिम्पिक चाचणीचे आयोजनही रद्द करण्यात आले आहे.आंतरराष्टÑीय नेमबाजी महासंघाची मान्यताप्राप्त असलेली ही स्पर्धा राजधानीतील कर्णीसिंग शुटिंग रेंजमध्ये १५ ते २५ मार्च या कालावधीत होणार होती. आॅलिम्पिक चाचणी स्पर्धेचे आयोजन १६ एप्रिलपासून होते. भारतीय राष्टÑीय रायफल संघाने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतील स्पर्धेचे आयोजन आॅलिम्पिकआधी दोन टप्प्यात होईल. स्पर्धेची नवी तारीख लवकरच जाहीर होईल. भारत सरकारने चीन, इटली, द. कोरिया, जपान आणि इराणच्या पर्यटकांवर निर्बंध घातले आहेत. २२ देशांनी या स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे आयोजन स्थगित केल्याची माहिती एनआरएआयने दिली.सूत्रांनी या स्पर्हेबाबत दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्रीपर्यंत २२ देशांनी माघार घेतली. दिल्ली विश्वचषकात रायफल, पिस्तूल तसेच शॉटगन प्रकाराचे आयोजन होणार होते.मागच्याच आठवड्यात भारताने सायप्रस येथे आयोजित आयएसएसएफ विश्वचषकातून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. आयएसएसएफने बुधवारी दिल्ली विश्वचषकातून कुठलेही मानांकन गुण मिळणार नाहीत, असे स्पष्ट केले होते.
नेमबाजी विश्वचषक स्पर्धा स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2020 4:23 AM